राजेंद्र काळे
बुलडाणा : सहकाराच्या माध्यमातून क्रांती होऊ शकते, हे चिखली अर्बन असो कि बुलडाणा अर्बन.. यांनी दाखवून दिले आहे. महाराष्ट्रातील अवसायानात आलेल्या बँका व कारखाने या जिल्ह्यातील सहकाराने उभे केले आहेत. सोशल बँकिंगच्या माध्यमातून चिखली अर्बन बँकेने तत्वशिलता जोपासत केलेले कार्य दखल घेण्यासारखे उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांनी केले. चिखली अर्बनच्या ६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते.
आर्थिक विश्वासाच्या बळावरच चिखली अर्बन बँकेची घौडदौड : सतिश गुप्त
आर्थिक विश्वासाच्या बळावरच दि चिखली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची घौडदौड सुरु असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष सतिश गुप्त यांनी करुन केवळ नफा डोळ्यासमोर न ठेवता समाजकार्य म्हणजेच आपले समाजाप्रती असलेले देणे हे बँक कधीच विसरलेली नाही. महिला स्वावलंबी होण्यासाठी व महिला सबलीकरणाकरिता बचत गटाची स्थापना करून त्यांना कर्जपुरवठा करीत आहे. आजपर्यंत ३५००० पेक्षा जास्त महिलांना बचतगटांच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले आहे. बँकेचे ठेवीदार, खातेदार, कर्जदार आणि सभासदांच्या सहकार्याने चिखली अर्बन बँकेने आर्थिक क्षेत्रात सर्वांचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे बँकेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामामुळे बँकेची घोडदोड आज वेगाने सुरू आहे. ३१ शाखा व ६ ग्राहक सुविधा केंद्रे असलेली चिखली बँक आज ६१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. आपण दाखविलेल्या विश्वासाच्या बळावर बँकेची वाटचाल सुरु असल्याचे सतिश गुप्त म्हणाले.
सहकार क्षेत्रात अग्रगण्य दि चिखली अर्बन को-ऑप बँकेची ६१ वी वार्षिक आमसभा आज रविवार १४ ऑगस्ट रोजी ‘रानवारा’वर उत्साहात पार पडली. खेळीमेळीच्या वातावरणात सभेपुढील सर्व विषय संमत करण्यात आले. या आमसभेच्या अध्यक्षस्थानी चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतिश गुप्त तर मंचावर बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, आ.श्वेताताई महाले, रा.स्व.संघाचे विभाग सरसंघचालक चित्तरंजन राठी, बँकेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम दिवटे, डॉ.आशुतोष गुप्त, संचालक विश्वनाथ जितकर, राजेंद्र शेटे, डॉ. गणेश मांटे, राजेश व्यवहारे, मनोहर खडके, जीवन सपकाळे, आनंद जेथनी, सुधाकर कुलकर्णी, राजेंद्र भाला, सुशील शेटे, शैलेश बाहेती, श्यामसुंदर पारीख, बँकेच्या संचालिका सौ.सुनीता भालेराव, सौ.मंजुताई कोठारी, सरव्यवस्थापक संजय भंगिरे आणि बँकेचे शाखा सल्लागार हे प्रामुख्याने उपस्थित होते.
आरंभी मान्यवराच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आले. त्यानंतर बँक कर्मचाऱ्यांनी स्वागत गीत सादर केले. मागील वर्षांमध्ये दिवंगत झालेले बँक संचालक, कर्मचारी, सभासद, ठेवीदार, हितचिंतक, हुतात्मा सैनिक, दिवंगत शास्त्रज्ञ, दिवंगत पत्रकार, कलाकार, साहित्यिक यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
समाज उन्नतीसाठी आर्थिक, शैक्षणिक, सहकार, अध्यात्मिक, वैद्यकीय, क्रीडा यामध्ये अलौकिक कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा बँक जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करते. यावर्षीचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार सहकार क्षेत्रात मोलाची कामगिरी करणारे बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांना चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतिश गुप्त यांच्या हस्ते सन्मान पूर्वक प्रदान करण्यात येऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आ.सौ.श्वेताताई महाले यांनी आपल्या मनोगतात चिखली अर्बनच्या सामाजिक कार्याचे कौतुक करुन सतिशभाऊंच्या मार्गदर्शनाने वैचारिक वारसा जोपासत सुरु असलेले कार्य या परिसरासाठी महत्वाचे असल्याचे सांगितले. बँकेचे सरव्यवस्थापक संजय भंगिरे यांनी अहवाल वाचन केले. सभेमध्ये १० वी उत्तीर्ण सभासद व कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचे वाटप बँकेच्या वतीने करण्यात आले. सभेमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी महिला बचत गटांच्या सभासदांना राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात आले. सुजित दिवटे यांनी सूत्रसंचालन केले तर अभिजीत देशपांडे यांनी उपस्थित सर्व सभासदांचे आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

