– पहाटेच जप्त टिप्पर; सिंदखेडराजा शिवारात खनिजमाफियांना मोठा धक्का!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – तालुक्यातून बेकायदेशीर वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे शासनाला लाखो रुपयांचा महसूल बुडत असताना, आज पहाटे(१३ सप्टेंबर)रोजी महसूल विभागाने वाळू माफियांवर धडक कारवाई केली. सकाळी ५.३५ वाजता असोला रस्त्यावर MH28 BB2671 क्रमांकाचा टिप्पर अंदाजे चार ब्रास रेतीसह पकडण्यात आला.
ही कारवाई उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार अजित दिवटे यांच्या थेट निर्देशाने करण्यात आली. नायब तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार वराडे व ग्राम महसूल अधिकारी गोरख पवार यांच्या पथकाने तत्परतेने सापळा रचून ही कारवाई अंमलात आणली. जप्त वाहन पोलीस ठाणे, सिंदखेड राजा येथे जमा करण्यात आले असून, वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यास प्रशासन आता सज्ज झाल्याचे संकेत या कारवाईतून मिळत आहेत. दरम्यान, देऊळगाव राजा तालुक्यातून अनेक ठिकाणी सिंदखेडराजा तालुक्यात चोरटी अवैध वाळू उत्खनन करून सिंदखेडराजा तालुक्यात वाहतूक सुरू असल्याच्या वारंवार तक्रारी असून, अशा कारवायांमुळे खनिज माफियांच्या हालचालींना आळा बसेल का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.