– जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आता एकाच आवारात; एकत्रिकरण करून सहशिक्षण; शासनाचे आदेश – सिंदखेडराजा तालुक्यातील चार शाळांचा समावेश; साखरखेर्डा येथील शाळांना सहशिक्षणाचे आदेश द्यावेत – ग्रामपंचायत
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डासह चार शाळांचे एकत्रिकरण करून सहशिक्षण सुरु करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. परंतु, साखरखेर्डा येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा आणि जिल्हा परिषद कन्या शाळा या दोन्ही शाळेला सहशिक्षण सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी साखरखेर्डा येथील ग्रामपंचायतीने केली आहे.
महाराष्ट्र शासन नवीन शिक्षण धोरण २०२० नुसार जिल्हा परिषद शिक्षण विषय सर्वसाधारण सभा १९/८२०२५, मुख्याधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांचे शाळा एकत्रिकरण आदेश सिंदखेडराजा पंचायत समितीला येऊन धडकले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. सिंदखेडराजा तालुक्यातील शेंदूर्जन येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा आणि जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा, किनगाव राजा येथील दोन्ही शाळा, आणि साखरखेर्डा येथील दोन्ही शाळा एकत्रिकरण करण्याचे आदेश धडकले आहेत. साखरखेर्डा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा आणि जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा ह्या दोन्ही खूप अंतरावर भरतात. दोन्ही शाळेत विद्यार्थी संख्या मुबलक प्रमाणात असून, दोन्ही शाळेचे एकाच आवारात भरणे शक्य नाही. दोन्ही शाळांना स्वतंत्र इमारत, भौतिक सुविधा उपलब्ध आहेत. दोन्ही शाळांना वाल कंपाऊंड आहे, दोन्ही शाळा भौगोलिकदृष्ट्या खूप अंतरावर आहे आणि साखरखेर्डा गावाची लोकसंख्या २५ हजार आहे. गावाचा विस्तार पाहता दोन्ही शाळांचे एकत्रिकरण न करता दोन्ही शाळांना सहशिक्षणाची परवानगी द्यावी, अशी मागणी ग्रामसभेत, ग्रामपंचायत बैठकीत आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्याकडे काल केली आहे. यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, सरपंच सौ.ज्योती अमित जाधव, माजी सभापती राजू ठोके, माजी सरपंच महेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य उल्हासराव देशपांडे, भानुदास लव्हाळे, माजी सरपंच कमलाकर गवई, अशोक इंगळे, माजी केंद्रप्रमुख दिलीप खंडारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, केंद्रप्रमुख कैलास ढोलेकर यांनी केली आहे.
दोन्ही शाळा एकत्रिकरण करताना त्यांचा यु डायस क्रमांक हा एकच राहणार आहे. दोन ठिकाणी शाळा भरल्यास हरकत राहणार नाही. पण मुख्याध्यापक हा एक राहिलं. – एस. के. निकम, गटशिक्षणाधिकारी, सिंदखेडराजा