प्रदीर्घ प्रशासकीय अनुभवाची शिदोरी ठरणार विद्यापीठाच्या फायद्याची!

admin 2 Min Read
2 Min Read

– संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ सिनेट सदस्यपदी आ.सिध्दार्थ खरात!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – मंत्रालयीन माजी जेष्ठ सनदी अधिकारी तथा मेहकर विधानसभेचे उच्चविद्याविभूषित आमदार सिध्दार्थ खरात यांची अमरावती विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली आहे. यानिमित्ताने आ. सिद्धार्थ खरात यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय अनुभवाचा फायदा शिक्षण क्षेत्रातदेखील होणार आहे. विधानसभेचे सदस्य म्हणून आमदार सिद्धार्थ खरात यांची विधानसभेचे अ़ध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी ही नियुक्ती केली आहे.

सन २०१५-२०१६ म़ध्ये पारित झालेल्या महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या निर्मितीत आमदार सिद्धार्थ खरात मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षण विभागात सहसचिवपदी कार्यरत असताना यामध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग राहिला आहे. यासह विविध कायदे बनवण्यातदेखील आ.सिध्दार्थ खरात यांचा सहभाग महत्त्वाचा राहिला आहे. त्यांनी गृहसह विविध विभागांत मोठ्या पदावर काम केले असून, विविध मंत्र्यांकडेसुद्धा ओएसडी म्हणून वाखाणण्याजोगे काम केले आहे. एकंदरीत मंत्रालयात उच्चपदावर असताना प्रत्यक्ष कायदा करणारा उच्चपदस्थ अधिकारीच मेहकर विधानसभेतून आमदार म्हणून निवडून येऊन त्यांची आता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिसभेवर सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. याबाबतचे पत्र महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय अवर सचिव घ.ज्ञा.देवबाडकर यांनी २० ऑगस्टरोजी जारी केले आहे. विशेषतः शिक्षण क्षेत्रात याचा नक्कीच मोठा फायदा होणार आहे. आमदार सिद्धार्थ खरात यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अधिसभेवर सदस्यपदी नियुक्ती झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असतानाच विशेषतः शिक्षण क्षेत्रातही आवश्यक सकारात्मक बदलाची आशा बाळगल्या जात आहे.

Share This Article
Exit mobile version