– मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस सरकारला अखेरचे ठणकावले!
– मराठा आरक्षणासाठी २७ तारखेला मुंबईकडे कूच; मराठा आरक्षणाचे आंदोलन पेटणार!
– तुमच्या हातात दोन दिवस; महाराष्ट्रातील मराठे वेठीस धरू नका – मनोज जरांगे पाटील
जालना (जिल्हा प्रतिनिधी) – मराठ्यांना आरक्षण न दिल्यास देवेंद्र फडणवीस यांचे सरकार उलथवून टाकेन, असा खणखणीत इशारा मराठा आरक्षणाचे योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी आज (दि.२५) आंतरवाली सराटी येथून दिला. मनोज जरांगे पाटील यांनी येत्या २७ तारखेला सकाळी १० वाजता मुंबईच्या दिशेने कूच करण्याची घोषणा केली आहे. मराठा आंदोलक बुधवारी सकाळी १० वाजता जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघतील. त्यानंतर २९ ऑगस्टरोजी ते मुंबईतील आझाद मैदानात पोहोचतील, असे त्यांनी आज येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत सांगितले.
आता आंदोलन खूप पुढे गेलेले आहे. आम्ही निघण्याच्या तयारीत आहोत, म्हणून शेवटचे सांगतो. आताही तुमच्या हातात दोन दिवस आहेत. महाराष्ट्रातील मराठे वेठीस धरू नये, असा इशारा मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. तुम्ही सरकार आहात आणि सरकारने राज्य अस्थिर करू नये. राज्य अस्थिर करण्याच्या राज्याचा प्रमुखाला अधिकार नाही. सरकार आडमुठ्याच्या भूमिकेत जाणार असेल, तर ही देशासाठी आणि राज्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. मराठ्यांचे असून देत नाही, म्हणजे आडमुडे मराठे नाही तर सरकार आहे, असेही मनोज जरांगे म्हणालेत. राज्यातील सर्व मराठ्यांनी कामधंदे बंद करा. व्यवसाय बंद ठेवा. नोकरदार यांनी काम बंद करा. मुंबईकडे निघा. जगाच्या पाठीवर या विजयाच्या सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी व्हा, असे आवाहन मनोज जरांगेंनी केले. कोणी शेताचे कारणे सांगू नका. जिथे जिथे टँकर असतील तिथे पाणी टँकर घ्या. समाजातील सर्व डॉक्टरांनी गोळ्या औषध घेऊन या. राजकारण्यांनी त्यांची वाहने द्या, असेही मनोज जरांगेंनी सांगितले. मला आंदोलन शांततेत पाहिजे. कोणी जाळपोळ दगडफेक करायची नाही, अशा सूचनाही मनोज जरांगेंनी दिल्या. आपल्या शेजारी जाळपोळ झाली तरी आपण पुढे चालायचे, असे मनोज जरांगे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस खुन्नस दाखवत आहेत. आजच्या दिवस प्रेमाने सांगतो. आम्हाला मुंबईला जायचं नाही. तुम्ही आरक्षण दिल्यावर, आम्हाला मुंबईला जायची गरज नाही. पण अंतरवली सोडल्यावर मी कोणत्याच मंत्र्याचे ऐकणार नाही, असे मनोज जरांगे म्हणालेत. दोन महिन्यापूर्वी मी स्वतः देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. मला गरीब मराठ्यांच्या वेदना तुमच्या पुढे मांडायच्या आहेत, तुम्ही अंतरवालीत या, असं मी देवेंद्र फडणवीसांना म्हणालो होतो, अशी माहिती मनोज जरांगेंनी दिली. देवेंद्र फडणवीस लक्ष घालत नसतील तर आडमुठे कोण हे मुंबईकरांनी सांगावे, असेही ते म्हणाले. तुम्ही आरक्षण न दिल्यास मी सरकारसुद्धा उलथवून टाकू शकतो…मी सोडत नसतो, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

