शेळगाव आटोळ येथील मृत युवकाच्या कुटुंबीयांना अखेर शासनाकडून चार लाखाची मदत

admin 2 Min Read
2 Min Read

– डॉ. विकास मिसाळ यांच्या पुढाकारातून मिळाला मोठा दिलासा
– नदीच्या पुरात पाय घसरून वाहून गेल्याने झाला होता दुर्देवी मृत्यू

देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) – बकर्‍यांना चारा आणण्यासाठी गेलेल्या चेतन वसंता बोर्डे (वय २२) या युवकाचा नदीच्या पाण्यात पाय घसरून पडल्याने व पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेल्याने दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना दि.१७ ऑगस्टरोजी चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ येथे घडली होती. या युवकाच्या कुटुंबीयांना शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. विकास मिसाळ यांनी केली होती. तसेच, जिल्हा प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावाही केला होता. त्यामुळे अखेर या बोर्डे कुटुंबीयांना चिखली तहसील कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून चार लाख रूपयांची तातडीची मदत देण्यात आली आहे. या मृत युवकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी, यासाठी आमदार मनोज कायंदे यांनीदेखील तहसीलदारांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

चेतन बोर्डे हा आपल्या बकर्‍यांसाठी पाला आणण्यासाठी गेला असता, नदीकाठी पाय घसरून तो पाण्यात पडला. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला होता, आणि मिसाळवाडी धरण पूर्ण भरले असून, मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले गेल्यामुळे पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान होता. या प्रवाहात तो अंदाजे एक किलोमीटरपर्यंत वाहत गेला. बराच वेळ शोधाशोध केला असता, शेवटी सुभाष सखाराम मिसाळ यांच्या शेताजवळील सिमेंट बंधार्‍यात त्याचा मृतदेह आढळून आला. मृतदेह पुढील तपासणीसाठी चिखली येथे नेण्यात आल्यानंतर त्याचे शवपरीक्षण करण्यात आले व नंतर नातेवाईकांच्या सुपूर्त करण्यात आला. शेळगाव आटोळ येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्देवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असताना या बोर्डे कुटुंबीयांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. विकास मिसाळ यांनी केली होती. त्यादृष्टीने त्यांनी सातत्याने चिखली तहसीलदार संतोष काकडे यांच्यासह जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे मृत पावलेला युवक चेतन वसंता बोर्डे याच्या परिवाराला आपत्ती व्यवस्थापन विभाग तहसील कार्यालय चिखली यांचेकडून ४ लाखाची मदत देण्यात आली आहे. यासाठी तहसीलदार संतोष काकडे यांच्यासह शेळगाव आटोळचे तलाठी सोळंकी, महसूल निरीक्षक सोनुने यांनी तातडीने कार्यवाही पूर्ण केली होती.
————–

बकर्‍यांना चारा आणण्यासाठी गेलेल्या युवकाचा नदीच्या पुरात बुडून मृत्यू!

Share This Article
Exit mobile version