– चिखली व बुलढाणा तालुक्यांत पावसाने दाणादाण; तहसीलदार संतोष काकडे यांच्याकडून सतर्कतेचा इशारा जारी
– मिसाळवाडीचा संपर्क तुटला; नदीला पूर आल्याने पूल पाण्याखाली!
– आमदार श्वेताताई महाले यांनी घेतला आढावा; तातडीने पंचनामे सुरू करण्याचे प्रशासनाला निर्देश
चिखली/देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे/राजेश लोखंडे/महेंद्र हिवाळे) – चिखली व बुलढाणा तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने हाहाकार उडाला असून, शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच, जनजीवन विस्कळीत झाले असून, मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. मिसाळवाडी धरण पूर्णक्षमतेने भरले असून, मिसाळवाडी नदीला महापूर आल्याने मिसाळवाडी गावाता संपर्क तुटला आहे, तर अनेक शेतकरी, विद्यार्थी अडकून पडले आहेत. तालुक्यातील ढगफुटीसदृश परिस्थिती पाहाता, तहसीलदार संतोष काकडे यांनी आज व उद्या (दि.१९) शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली असून, सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी चिखली व बुलढाणा तालुक्यातील पूरस्थिती व नुकसानीचा आढावा घेतला असून, तातडीने पंचनामे सुरू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. तसेच, कृषी व महसूल प्रशासनाला मदतीचा हात देण्याचेही निर्देशित केले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे चिखली तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. यातच महत्वाचा मार्ग चिखली ते बुलढाणा मार्ग मालगणी आणि हातणी पुलावरून पाणी वाहत असल्याने बंद झाला आहे. या गंभीर परिस्थितीचा विचार करून चिखली तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना दि.१८ व दि.१९ ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चिखली तहसीलचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी संतोष काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे नदी नाल्यासह अनेक ठिकाणी पाणी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार दोन दिवसांची सुट्टी घोषित करण्यात आली आहे. यावेळी तहसीलदार काकडे यांनी नागरिकांना इशारा देत सांगितले की, गरजेपोटीच घराबाहेर पडा. पूरस्थितीचा अंदाज घेऊन सुरक्षिततेला प्राधान्य द्या. दरम्यान, मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीसह दळणवळणावरही मोठा परिणाम झाला आहे. प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे
चिखली व बुलढाणा तालुक्यामध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत!
संपूर्ण चिखली विधानसभा मतदारसंघातील चिखली शहर व परिसरातील अनेक गावांमध्ये सतत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले आहेत, काही ग्रामीण व शहरी भागातील घरांमध्ये पाणी घुसले आहे, आणि बर्याच गरीब मायमाऊल्यांच्या घराच्या भिंतीही कोसळल्या आहेत, शेतजमिनी खरडून गेल्या आहेत आणि पिकांची अवस्था अत्यंत वाईट आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये आ. सौ. श्वेता महाले पाटील यांनी जिल्हाधिकारी यांचेशी फोनद्वारे चर्चा करून दोन दिवस सतत झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्यासाठी आणि नुकसानग्रस्त भागामध्ये मदत व पुनर्वसन कार्य सुरू करण्यासंबंधी चर्चा केली तसेच चिखलीचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, व मुख्याधिकारी यांना बाधित जनतेसाठी मदतकार्य पुरवण्यासंबंधी सूचना करण्यात आल्या. शासनाकडून तात्काळ मदत व पुनर्वसन सुरू होईलच बाधित भागाचे पंचनामे ही त्वरित सुरू होतील, परंतु केवळ शासकीय मदत, पंचनामे याची वाट न पाहता आ. सौ. श्वेताताई महाले यांनी मतदारसंघातील सर्व शहरातील व ग्रामीण भागातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनाहि विनंती केली आहे की, अशा कठीण प्रसंगात सर्वांनी जात, धर्म, पंथ,पक्ष अशी कुठलीही गोष्ट मनात न आणता फक्त भारतीय म्हणून रस्त्यावर उतरावे.आणि आवश्यकतेप्रमाणे व कुवतीप्रमाणे आपल्या भागातील नागरिकांची तन-मन, धनाने शक्य होईल ती मदत करावी असे आवाहन केले आहे. तसेच चिखली मतदार संघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी कार्यकर्त्यांना आव्हान केले आहे की, अशा कठीण प्रसंगात आपण सर्वांनी जात, धर्म, पंथ, पक्ष अशी कुठलीही गोष्ट मनात न आणता फक्त भारतीय म्हणून रस्त्यावर उतरायचे आहे, आणि आवश्यकतेप्रमाणे व कुवतीप्रमाणे आपल्या भागातील नागरिकांची तन-मन धनाने शक्य होईल ती मदत करायची आहे, असेही आ. श्वेताताई महाले यांनी आवाहन केले आहे.
——–
पेनटाकळी प्रकल्पाद्वारे सतर्कतेचा इशारा
सततच्या पावसाने पेनटाकळी प्रकल्पामधील पाण्याची वाढ झाल्याने ९ गेट ३० सेंटिमीटरने उघडल्याने पेन गंगेला पूर येत असल्याने पेनगंगेलगतच्या गावांना व शेतकर्यांना सतरतेचा इशारा देण्यात आला आहे.
——-
चिखली तालुक्यातील मिसाळवाडी गावात जाण्यासाठी एकच रस्ता आहे, परंतु पुलाची उंची कमी असल्याने पुलावरून जाता येत नाही व गावात जाण्यासाठी एकच रस्ता आहे, त्यामुळे शाळेत जाणारी मुले व शेतकरी-मजूर यांना खूपच अडचण होत आहे, पुलाची उंची वाढवावी लागते यासाठी आमदार मनोजभाऊ कायंदे यांना निवेदनसुध्दा दिले आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती कायम्ा येत असते, त्यामुळे शेतकरीवर्ग पाणी लवकर कमी होत नसल्याने आठ ते दहा तास अडकून पडतात, त्यासाठी पुलाची उंची वाढवावी. दरवर्षी अशा प्रकारे धरण भरून नदीला पूर येतो, आजदेखील महापूर आल्याने मिसाळवाडी गावाचा संपर्क तुटलेला आहे.
– हनुमान मिसाळ, उपसरपंच, मिसाळवाडी

