– शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे व शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांच्याशी अधिकारी संघाची यशस्वी चर्चा! – उद्यापासून राज्यभरातील सामूहिक रजेवरील ४०० अधिकारी कामावर हजर होणार!
मुंबई/बुलढाणा (सुरेश हुसे) – राज्यात शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी राज्यात विविध ठिकाणी शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचार्यांचे अटकसत्र सुरू आहे. मात्र, या पुढील काळात कोणत्याही निरापराध अधिकारी कर्मचार्यावर चुकीची कारवाई होणार नाही. विनाचौकशी कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांना नियमबाह्य पद्धतीने अटक केली जाणार नाही, या मागणीला राज्याचे शालेय शिक्षणमंत्री व शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी कर्मचारी संघ यांच्यातर्पेâ सुरू करण्यात आलेल्या सामूहिक रजा आंदोलनाला मंगळवारी (दि.१२) स्थगिती देण्यात आली. नागपूर विभागातील शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी शिक्षण विभागातील अधिकार्यांना विनाचौकशी अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाने १ ऑगस्टरोजी एक दिवस रजा आंदोलन करून शासनास निवेदन दिले होते. मात्र, शासनाकडून कोणतीही ठोस दखल न घेतल्याने संघटनेने ८ ऑगस्टपासून सामूहिक रजा आंदोलन पुकारले होते.
अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघातर्फे विविध मागण्यांसाठी ८ ऑगस्टपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन सुरू करण्यात आले. मात्र, राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे व शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांच्याशी संघटनेच्या पदाधिकार्यांनी विविध मागण्यांवर चर्चा केली. त्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर संघटनेने तूर्तास बेमुदत सामूहिक रजा आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. नागपूर विभागासह सर्व बोगस शालार्थ प्रकरणांची चौकशी शासनाने गठीत केलेल्या विशेष चौकशी समितीकडे वर्ग करावी, विना चौकशी कोणत्याही अधिकारी कर्मचारी यांना नियमवाह्य अटक करू नये, शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी निलंबित झालेले सर्व अधिकारी यांना सेवेत पुनर्स्थापित करण्यात यावे, या सर्व मागण्याबाबत मंत्री व प्रधान सचिव यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत ठोस आश्वासन दिले. संघटनेच्या सर्व न्याय मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला जाईल. तसेच संघटनेच्या मागण्यांच्या निवेदनाबाबत पोलिस विभागाला शासन स्तरावरून कळवण्यात येईल. कोणत्याही निरापराध अधिकारी कर्मचारी यांच्यावर चुकीची कारवाई होणार नाही, अशा प्रकारचे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे व प्रधान सचिव यांनी संघटनेला दिले आहे. संघटनेचे दि. ८ ऑगस्ट २०२५ पासून सुरू असलेले सध्याचे बेमुदत सामूहिक रजा आंदोलन तूर्तास स्थगित आले. मात्र, यापुढे अशा प्रकारची विनाचौकशी नियमबाह्य पध्दतीने अटक झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता स्तगित केलेले आंदोलन पुन्हा सुरू केले जाईल, असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला. तसेच सर्व शिक्षणसेवा राजपत्रित अधिकारी कर्मचारी यांनी बुधवार, दि.१३ ऑगस्टपासून पूर्ववत कामावर रूजू व्हावे, असे आवाहन अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाच्यावतीने करण्यात आले आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज (११ ऑगस्ट) पुणे येथील आयुक्त शिक्षण कार्यालयासमोर राज्यभरातील सुमारे ४०० अधिकारी जमले होते. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच काही लोकप्रतिनिधीही उपस्थित राहून पाठिंबा व्यक्त केला होता.