– दिल्लीत जोरदार राडा : राहुल गांधी, प्रियंका गांधी-वढेरा पोलिसांच्या ताब्यात!
– अखिलेश यादव यांनी बॅरिगेट तोडले, महिला खासदार बेशुद्ध!
– मतचोरी प्रकरणावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधक आक्रमक!
नवी दिल्ली (आवेश तिवारी) – निवडणूक आयोगाच्या मतचोरीचा बुरखा काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांनी फाडल्यानंतर आज त्यांच्यासह सुमारे ३०० विरोधी पक्षांच्या खासदारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा नेला. यावेळी पोलिसांनी मोर्चातील सहभागी नेत्यांना व खासदारांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. खा. राहुल गांधी, खा.प्रियंका गांधी-वढेरा यांना पोलिसांनी मोठ्या झटापटीनंतर ताब्यात घेतले. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी बॅरिगेट तोडून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या झटापटीत एक महिला खासदार बेशुद्ध पडल्या. सर्व राजकीय नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर पार्लामेंट पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते. दरम्यान, संसदेच्या दोन्ही सभागृहात मतचोरीप्रकरणी जोरदार गदारोळ उडाला. त्यामुळे संसदेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते. त्यानंतरही याप्रश्नी विरोधकांनी मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले.
या मोर्चात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह सर्व विरोधी पक्षांचे नेतेदेखील सहभागी झाले होते.
संतप्त झालेल्या खासदारांनी निवडणूक आयोगाने चुकीचं काही केलेलं नाही, तर कशासाठी अडवत आहात? अशी विचारणा केली. मतांवर दरोडा टाकू नका, असा हल्लाबोलही खासदारांनी केला. निदर्शने करणाऱ्या विरोधी खासदारांना पोलिसांनी परिवहन भवनात बॅरिकेड लावून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाकडे जाण्यापासून रोखले. यादरम्यान खासदार वेणुगोपाल यांचा पोलिस अधिकाऱ्यांशी वादही झाला. मोर्चात सहभागी झालेले काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की,-माझ्यासाठी हा मुद्दा खूप सोपा आहे. राहुल गांधींनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत, ज्यांची उत्तरे दिली पाहिजेत. निवडणूक आयोगाची केवळ देशाप्रती जबाबदारी नाही, तर आपल्या निवडणुकांच्या विश्वासार्हतेबद्दल लोकांच्या मनात शंका नसावी ही त्यांची स्वतःची जबाबदारी देखील आहे. निवडणुका संपूर्ण देशासाठी महत्त्वाच्या आहेत. आपली लोकशाही इतकी मौल्यवान आहे की डुप्लिकेट मतदान, अनेक पत्ते किंवा बनावट मते आहेत की नाही याबद्दल शंका घेऊन ती धोक्यात आणता येणार नाही. जर लोकांच्या मनात काही शंका असतील तर त्या दूर केल्या पाहिजेत. या प्रश्नांची उत्तरे उपलब्ध असू शकतात, परंतु ही उत्तरे विश्वासार्ह असली पाहिजेत. माझी एकच विनंती आहे की निवडणूक आयोगाने हे प्रश्न हाती घ्यावेत आणि त्यांचे निराकरण करावे.

