– गोकुळाष्टमी सप्ताहात भाविकांना धार्मिक पर्वणी
– कोट्यवधी रुपये देणगीतून सुवर्णकलश होणार लोकार्पण
आळंदी (अर्जुन मेदनकर) : श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात श्रीकृष्ण आणि माऊली जन्मोत्सव सोहळा गोकुळाष्टमी सप्ताहांतर्गत विविध धार्मिक कार्यक्रमांनी रविवार ( दि.१० ) पासून हरिनाम गजरात माउली मंदिरात प्रारंभ झाला. या निमित्त आळंदीत भाविकांना धार्मिक पर्वणी लाभणार आहे. यावर्षीचा जन्मोत्सव सोहळा हा ७५० वा जन्मोत्सव असल्याने मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजनातून प्रथा परंपरांचे पालन करीत साजरा होत आहे.
गोकुळाष्टमी सप्ताहासाठी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त, विश्वस्त आणि सेवक कर्मचारी, आळंदीकर ग्रामस्थ, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, तुकाराम माने, श्रीचे सेवक चोपदार बाळासाहेब रणदिवे, राजाभाऊ रंधवे, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, संस्थानचे सेवक मानकरी, कर्मचारी वृंद भाविक,नागरिक यांचे माध्यमातून तयारीसह नियोजन केले जात आहे. या जन्मोत्सवातील विविध धार्मिक उपक्रमात भाविक, नागरिकांनी सहभागी वाहावे असे आवाहन आळंदी देवस्थानने केले आहे. आता पर्यंत मोठ्या प्रमाणात सोने आणि काही कोटी रुपये जमा झाले असून भाविकांनी आळंदी देवस्थान ला सुवर्ण कलश उपक्रमास मदत करावी असे आवाहन आळंदी देवस्थानने सोशल मीडियाद्वारे केले आहे.
कृष्ण जन्माष्टमी हा एक प्रसिद्ध हिंदू सण आहे. जो भगवान कृष्णाच्या पूजेला समर्पित आहे, त्यांचा जन्मोत्सव देशासह परदेशातही साजरा केला जातो. कृष्ण जन्माष्टमी दिनी श्रीकृष्ण आणि माऊली जन्मोत्सव ( ज्ञानाष्टमी ) आळंदीत देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सप्ताहात राज्यात मोठ्या प्रमाणात कार्यक्रम राज्य शासनाचे माध्यमातून देखील होत आहेत. यात गावागावांसह शहरात श्रींचे प्रतिमा, साहित्य, ग्रंथ पालखी मिरवणूक, पसायदानाचा वाचन राज्यातील शाळाशाळांतून होणार आहे. सर्वानी या पवित्र उत्सवात सहभागी होऊन आपण आपापल्या भागात परिसरात उपक्रमांचे आयोजन करून सहभागी व्हावे असे आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे वाटणे अध्यक्ष प्रकाश काळे यांनी केले आहे. या काळात संत साहित्याचा प्रचार प्रसार होऊन घरा घरात हरिपाठ, ज्ञानेश्वरी साहित्य पोहोचावे यासाठी या ज्ञानयज्ञात सर्वानी सहभागी व्हावे. असे आवाहन काळे यांनी केले आहे.
काम तर्फे सुवर्ण कलश उपक्रमास २ लाख, २१ हजार, ७५१ रुपये देणगी
स्वकाम सेवा मंडळ आळंदी यांचे तर्फे श्रींचे सुवर्ण कलश उपक्रमास २ लाख, २१ हजार, ७५१ रुपये देणगी अध्यक्ष श्री सुनील ज्ञानेश्वर तापकीर यांचे हस्ते आळंदी देवस्थानचे विश्वस्त निलेश लोंढे महाराज यांचे यांचे कडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी स्वकाम सेवा मंडळाचे संस्थापक आणि आळंदी देवस्थानचे माजी विश्वस्त डॉ. सारंग जोशी, महिला विंग अध्यक्षा आशा तापकीर यांचेसह स्वकाम सेवा मंडळाचे मान्यवर पदाधिकारी स्वकाम सेवक, महिला, पुरुष आदी उपस्थित होते. यावेळी देवस्थान विश्वस्त निलेश महाराज लोंढे यांनी स्वकम सेवा मंडळाचे पदाधिकारी यांचा देणगी स्वीकृत करून स्वकाम सेवा मंडळास माऊलींची प्रतिमा आणि मान्यवरांना उपरणे, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. स्वकाम सेवा मंडळ राज्यातील मंदिरांत जाऊन विविध प्रसंगी स्वच्छता, अमृत सेवा उपक्रम राबवित राज्यातील मंदिरांत सेवा रुजू करीत असते.

