किनगावराजाच्या ठाणेदारपदी संजय मारतोंडकर रूजू!

admin 1 Min Read
1 Min Read

– विनोद नरवाडे यांची तडकाफडकी पोलिस नियंत्रण कक्षात बुलढाणा येथे बदली
– अवैध दारू, रेती वाहतूक व घरफोड्या रोखण्याचे आव्हान; नागरिकांच्या नाराजीवर मात करणे मोठे काम!

सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – सिंदखेडराजा तालुक्यातील किनगावराजा पोलिस स्टेशनमध्ये नूतन ठाणेदार म्हणून संजय मारतोंडकर यांनी काल, दिनांक ९ ऑगस्टरोजी सकाळी पदभार स्वीकारला आहे. याआधी ते चिखली शहर पोलिस स्टेशनला दुय्यम ठाणेदार म्हणून कार्यरत होते.

पूर्वीचे ठाणेदार विनोद नरवाडे यांची तडकाफडकी बदली पोलिस नियंत्रण कक्ष, बुलढाणा येथे करण्यात आली. त्यांच्या जागी मारतोंडकर यांची किनगावराजा येथे वर्णी लागली आहे. मात्र, या पोलिस स्टेशनच्या कार्यप्रणालीबाबत नागरिकांमध्ये सध्या नाराजीची भावना आहे. हद्दीत गेल्या काही महिन्यांत अनेक घरफोड्या व चोरीच्या घटना घडल्या असून, अनेक प्रकरणांचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याशिवाय, किनगावराजा पोलिस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री व अवैध रेती वाहतूक सर्रास सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या सर्व गैरकृत्यांवर अंकुश ठेवणे आणि प्रलंबित गुन्ह्यांचा तपास वेगाने पूर्ण करणे, हे नव्या ठाणेदारांसमोर मोठे आव्हान आहे. नागरिकांच्या अपेक्षेनुसार, अवैध धंदे बंद करून चोरी व घरफोड्या रोखण्यात ठाणेदार मारतोंडकर कितपत यशस्वी ठरतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

Share This Article
Exit mobile version