– तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी – कालपासून क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते शेतकर्यांसाठी मैदानात!
चिखली (राजेश लोखंडे) – तालुक्यात काल, दि. ९ ऑगस्ट ला ढगफुटीसदृश पाऊस झाला. या पावसाने अक्षरशः थैमान घातल्याने नदी-नाल्यांनी मार्ग बदलून शेतशिवारात पाणीच पाणी झाल्याने शेती आणि पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकर्यांवर अतिवृष्टीचे मोठे संकट ओढावले आहे. त्यामुळे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांनी कृषी सहाय्यक व तलाठी यांना सोबत घेऊन शेतकर्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रामेश्वर अंभोरे यांनी केली आहे. कालपासून क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक व नितीन राजपूत हेदेखील शेतबांधावर व अतिवृष्टीग्रस्त गावांत धावून जात असून, तहसीलदार व कृषी अधिकारी यांच्यामार्फत तातडीने पंचनामे करण्यासाठी प्रशासनावर दबाव निर्माण केला आहे. त्यामुळेच महसूलमंत्र्यांना तातडीने पंचनाम्यांचे आदेश द्यावे लागले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून अतिवृष्टी, नापिकी यामुळे शेतकरी संकटात आहेत. यावर्षी शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात खर्च करून पेरणी करावी लागली. बँकेचे कर्ज घेऊन, दागदागिने गहाण ठेवून पेरणीचा खर्च करावा लागला. सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मका या पिकांची लागवड चिखली तालुक्यात केलेली आहे. दरम्यान, काल चिखली तालुक्यात पावसाने प्रचंड मोठे थैमान घातले. शेतजमिनी खरडून गेल्या, पिके वाहून गेली तर काही ठिकाणी शेतांचे तलाव तयार झाले आहेत. या पावसाने शेतकर्यांचे उभे पीक मोठ्या प्रमाणात पाण्यात बुडाल्याने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन मोठी हानी झाली आहे. पावसाच्या या प्रकोपामुळे पांढरदेव, वरखेड, भोरसा भोरशी, सावंगी गवळी, नायगाव बुद्रूक, मंगरूळ नवघरे, घानमोड मानमोड, अंबाशी, खैरव अशा अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे शाळेमध्ये पाणी शिरले, घरात पाणी शिरले, जनावरांच्या गोठ्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांच्या घरातील अन्नधान्य, घरातील साहित्य – कपडे खराब झाले असून, अनेक गावांमध्ये विजेच्या तारा तुटून मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांनी कृषी विभागातील अधिकार्यांना सोबत घेऊन थेट बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. तसेच बाधित गावातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली. यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे रामेश्वर अंभोरे, हेमंत शेजोळ, गणेश शेजोळ, अशोक शेजोळ, नंदूभाऊ पांचाळ, विनोद हांडे, संतोष आकाळ, योगेश आकाळ, नागेश आकाळ, संदीप ढोरे, तलाठी वराडे साहेब, कृषी सहाय्यक डुकरे पाटील मॅडम यासह शेतकरी उपस्थित होते.