– चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांनी वेधले राज्य सरकारचे लक्ष; शेतकर्यांना नुकसान भरपाईचीही मागणी
चिखली (महेंद्र हिवाळे) – चिखली विधानसभा मतदारसंघातील पांढरदेव व इतर ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे बरेच नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर काल चिखली येथे देवाभाऊ लाडकी बहीण पतसंस्था या पतसंस्थेच्या उद्घाटनासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आले असता, कार्यक्रमस्थळीच आपल्या भाषणामध्ये चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यतत्पर आमदार सौ.श्वेता महाले पाटील यांनी अतिवृष्टी व काही दिवसापूर्वी हुमणीअळी या दोन नैसर्गिक संकटांनी शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले असून, या नुकसानीची भरपाई शासनाकडून त्वरित त्यांना प्राप्त व्हावी, याकरिता आपल्या भाषणातच महसूलमंत्र्यांना साकडे घातले. त्याची लगेचच देखल घेत महसूलमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला यानुकसानीचे पंचनामे करून तातडीने शासनास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कालच्या नुकसानीचे पंचनामे सुरू होणार आहेत.
शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शनिवारी जिल्ह्यातील देऊळगावराजा, चिखली आणि सिंदखेडराजा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. पुरामुळे काही गावांचा संपर्क तुटला होता. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. काल, रक्षाबंधनाच्या दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी स्थापन होत असलेल्या देवाभाऊ लाडकी बहीण पतसंस्थेच्या उद्घाटन कार्यक्रमातदेखील चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी महसूलमंत्र्यांना शेतकर्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी, ही मागणी केली. त्यामुळे भारावलेल्या महसूलमंत्र्यांनी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार म्हणून श्वेताताई महाले पाटील लाभलेल्या आहे हे या मतदारसंघाचे भाग्य आहे, असे आमदार श्वेताताईंचे कौतुक केले. त्याचबरोबर महसूलमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच चिखलीचे तहसीलदार यांनी संबंधित यंत्रणांना ताबडतोब सूचित करून अतिवृष्टीने बाधित चिखली तालुक्यातील भोरसाभोरसी, वरखेड, सावंगी गवळी, मंगरुळ नवघरे, पांढरदेव, घानमोड-मानमोड, अंबाशी, खैरव अशा अनेक गावांत, तसेच सिंदखेडराजा, देऊळगावराजा या तालुक्यांतील अनेक गावांत ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने प्रचंड नुकसान झाले. शेतकरी आणि ग्रामस्थांना आर्थिक मदत द्यावी व नुकसानीचे पंचनामे त्वरित करून तसा अहवाल सादर करावा, असे आदेश दिले. आमदार श्वेताताई महाले यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्र्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे शेतकर्यांना रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी आपली ताई सदैव आपल्या सोबत असल्याबद्दल खात्री निर्माण झाली आहे. चिखली तालुक्यातील पांढरदेवसह भोरसा भोरसी, वरखेड, सावंगी गवळी, मंगरुळ नवघरे, घानमोड मानमोड, अंबाशी, खैरवसह अन्य गावांमध्ये शनिवारी सकाळी ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. उभी पिके पाण्याखाली गेली. घरांची पडझड झाली. दुपारी दीड वाजेपर्यंत पावसाची मुसळधार कायम होती, या सर्व नुकसानग्रस्त शेतकरी, ग्रामस्थांना लवकरच दिलासा मिळणार आहे.
देऊळगावराजा तालुक्यातदेखील काल मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत मुसळधार पाऊस सुरू होता. आमना नदीला पूर आल्याने आमना ते आसोला मार्ग बंद झाला होता. अनेक ठिकाणी गावातील रस्त्यांवरून पाणी वाहून लागल्याने रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले होते. शेतातील पिके पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. सिंदखेड राजा तालुक्यात शुक्रवारी सायंकाळपासून संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर आला. गाव तलाव ओव्हरफ्लो झाले. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. दुसर्या दिवशीही अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम होता. तसेच, तालुक्यातील खडकपूर्णा प्रकल्प ८५ टक्के भरला आहे. पाऊस सुरूच असल्याने धरणाचे काही दरवाजे उघडले जाणार आहेत. मेहकर तालुक्यातील पेनटाकळी धरण भरले असून, कोराडी आणि उतावळी हे दोन मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. खामगाव तालुक्यातील रायधर लघु पाटबंधारे प्रकल्प शंभर टक्के भरला आहे.
————–
ढगफुटीसदृश पावसाने चिखली तालुका झोडपला; घरांची पडझड, शेतीपिकांचे अतोनात नुकसान!

