साखरखेर्डा भागातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक बेपत्ता!

admin 3 Min Read
3 Min Read

– अतिवृष्टी झाली तरीही हजर नाही; महसूलमंत्र्यांच्या आदेशानंतरही पंचनाम्यांना सुरूवात नाही!
– नियुक्तीच्या ठिकाणी हजर न राहणार्‍या कृषी सहाय्यकांवर कारवाईची शेतकर्‍यांची मागणी

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – साखरखेर्डा भागातील प्रत्येक गावात कृषी सहायक म्हणून कृषी विभागाने कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. परंतु, साखरखेर्डा वगळता एकही कृषी सहायक आपल्या कर्तृत्वाच्या गावात येत तर नाही, राहातसुध्दा नाही. फोन केला तर घेत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ते कृषी सहायक शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पंचनामा करतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, कालच राज्याच्या महसूलमंत्र्यांनी पंचनाम्याचे आदेश दिले असताना अद्यापही जिल्हा प्रशासनाचा कोणताही कर्मचारी शेतबांधावर पोहोचला नव्हता.

काल, दि. ९ ऑगस्टरोजी साखरखेर्डा भागात अतिवृष्टी झाली. नदी नाल्याला पूर आल्याने शेतात पाणी घुसले, उभी पिके खरडून गेली, हाती येणार्‍या पिकांची संपूर्ण वाट लागली. या पिकाची पाहणी करून महसूल विभाग, कृषी अधिकारी, ग्रामसेवक यांनी पाहणीअहवाल शासनाला सादर करावयाचा असतो. अतिवृष्टी होताच सवडद, राताळी, मोहाडी, शिंदी येथील सरपंच आणि शेतकर्‍यांनी संबंधित कर्मचार्‍यांना माहिती दिली. काल साखरखेर्डा येथील महसूल ग्राम अधिकारी प्रशांत पोंधे आणि कृषी सहायक छबुलाल कोल्हे हे दोघे शासनाच्या कोणत्याही आदेशाची वाट न पाहता, शेतकर्‍यांचा बांधावर जाऊन प्राथमिक पाहणी केली. सर्व उपस्थित शेतकर्‍यांना दिलासा देत त्यांनी सांगितले की, पाणी ओसरल्यावर सर्व नदीकाठच्या शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन वस्तूनिष्ठ पंचनामा करून शासनाला सादर केला जाईल. प्राथमिक माहिती म्हणून काही माहिती घेऊन तहसीलदार यांना पाठविली आहे, असा विश्वास त्यांनी दिला. सवडद येथील सरपंच गजानन देशमुख आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेजराव देशमुख यांनी तेथील कृषी सहायक शरद पवार यांना फोन लावला असता, त्यांनी मोबाईल फोन घेतला नाही. त्यानंतर प्रभारी तालुका कृषी अधिकारी आणि साखरखेर्डा भागाचे मंडळ कृषी अधिकारी भागवत किंगर यांना फोन लावला असता, त्यांनी शरद पवार दौर्‍यावर आहेत. नेमके कोठे आहेत हे सांगा आणि त्यांना कॉनफरन्सवर घ्या, अशी मागणी केली. तर शरद पवार त्यांचाही फोन घेत नाही, असे उर्मट उत्तर दिले. अशीच परिस्थिती शिंदी, राताळी, मोहाडी येथील शेतकर्‍यांची आहे. कृषी सहायक गावात राहत नाही, गावात कधी येत नाही. अशा कृषी सहायकावर कारवाई करावी, अशी मागणी या भागातील शेतकरी यांनी केली आहे.


बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा व देऊळगावराजा, मेरा, शिंदी साखरखेर्डा तसेच पांढरदेव ता. चिखली येथे ढगफुटीसदृश पाऊस होऊन घरांचे, शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरात पाणी घुसले असून शेती वाहून गेली आहे. येथील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले असून सरकारने तातडीने याची नोंद घ्यायला हवी. ताबडतोब येथील पंचनामे करुन या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.

साखरखेर्डा मंडळात आभाळ फाटले; हजारो हेक्टरवरील पिके गेली वाहून!

Share This Article
Exit mobile version