चोरट्यांच्या भीतीपोटी हनुमान मंदिराला लागले कुलूप!

admin 2 Min Read
2 Min Read

– संस्थेच्या पदाधिकार्‍यांचा अनोखा निर्णय; चोरटे देवालाही सोडत नसल्याने संताप!

चिखली (रंजना मोरे) – मंदिरे भक्तांसाठी खुली असतात आणि तिथे प्रार्थना करण्यासाठी किंवा दर्शनासाठी लोक नेहमी येत असतात. परंतु काही विशिष्ट परिस्थितीत मंदिराला कुलूप लावावे लागते. असाच एक प्रकार गुंजाळा येथे उघडकीस आला. त्यामध्ये तीन ते चार दिवसापूर्वी अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी फोडून पैसे पळविले होते. त्यामुळे संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी एक आगळा वेगळा निर्णय घेवून चक्क हनुमान मंदिराला कुलूपच लावून टाकले आहे.

अंढेरा पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या गुंजाळा येथे गावात पूर्वेला एक मध्यम आकाराचे हनुमान मंदिर आहे. मंदिराची रचना अत्यंत शोभिवंत असून, त्यामध्ये जवळजवळ साडेचार-पाच फूट उंच व ३ फूट रुंद अशी हनुमानाची सुंदर दगडी मूर्ती आहे. पूर्वी हे मंदिर अत्यंत साधे होते. परंतु आता त्यामध्ये फार मोठा बदल करण्यात आला. हे हनुमान मंदिर गावाच्या मधोमध असल्याने गावकर्‍यांना मंदिरात जाण्यासाठी फारसे चालावे लागत नाही. मंदिराच्या समोर व आतमध्ये खूप जागा असल्याने गावचे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम तेथेच होतात. येथे नारळ फोडण्यासाठी आणि दर्शनासाठी मोठ्या संख्येने महिला पुरुष येतात आणि बराच वेळ मंदिराच्या ओट्यावर अथवा मंदिरात बसून विश्रांती घेतात. गावकरी या मंदिरात दरवर्षी ‘अखंड हरिनाम सप्ताह’ साजरा करतात, त्यामुळे गावकर्‍यांनी २० ते २५ लाख लोकवर्गणी गोळा करून भव्यदिव्य असे मंदिर बांधले. या मंदिरात पूर्वीपासून तर आजपर्यत भाविक सकाळी ४ वाजता काकडा घेत होते. मात्र हा उपक्रम काही महिन्यापासून बंद करण्यात आला, आणि त्याऐवजी सकाळी स्पीकरमध्ये आरती व देवाची गाणे वाजविली जात आहेत. याच मंदिरात विठ्ठल-रखमाई यांचे लहानसे मंदिर आहे. परंतु, या अगोदरही काही महिन्यापूर्वी या मंदिरातील एक सोन्याची पोत आणि आई भवानी मंदिरातील सोन्याच्या वस्तू चोरीला गेल्या होत्या. त्यावर गावकर्‍यांनी पडदा टाकला होता. मात्र आता पुन्हा अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटीचे कुलूप तोडून त्यातील पैसे पळविले आहे. परंतु, दानपेटीमध्ये किती पैसे होते, आणखी काय असेल, हे सांगता येत नाही. चोरटे देवालाही सोडत नसल्याने गावकर्‍यांनी चक्क मंदिराच्या गेटलच कुलूप लावले आणि हे कुलूप सकाळी आणि संध्याकाळी तासा पुरतेच उघडले जाते. त्यामुळे देव मंदिरात बंदिस्त केल्याने गावावर काही संकट येऊ शकणार का, आणि गावकर्‍यांना त्या संकटाला सामोरे जावे लागणार का, अशी चर्चा गावकरी करत आहेत.

Share This Article
Exit mobile version