– भोगावती नदीचे रौद्ररूप; तलाठी आणि कृषी अधिकारी यांनी केली प्राथमिक पाहणी! – पाणी ओसरल्यावर होणार शेतीच्या नुकसानीचा सर्व्हे! – पिंपळगाव सोनारा येथील नाल्याला पूर; गावाचा संपर्क तुटल्याने सायंकाळपर्यंत विद्यार्थी ताटकळले! – लेंडी नाल्याचे पाणी शेतात घुसल्याने अनेक शेतकर्यांचे अतोनात नुकसान!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – साखरखेर्डा मंडळातील १० ते १२ गावात ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने भोगावती नदीने रौद्ररूप धारण केले आहे. अनेक शेतकर्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरले आणि उभ्या पिकाची प्रचंड प्रमाणात नासाडी झाली आहे. या पूरस्थितीची प्राथमिक पाहणी ग्राम महसूल अधिकारी आणि कृषी सहायक यांनी केली असून, शेतातील पाणी ओसरल्यावर पुढील सर्व्हे करण्यात येणार आहे.
साखरखेर्डा येथील भोगावती नदीला २००६ सालानंतर हा महापूर आला आहे. आज, दि.९ ऑगस्टरोजी सकाळी ९ वाजता पावसाला सुरुवात झाली. तब्बल १ वाजेपर्यंत संततधार पावसामुळे ढगफुटीसारखा पाऊस बरसत राहिला. साखरखेर्डा येथील उत्तरेला असलेल्या शेतकर्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरले. शिवाजी जाधव, ललित अग्रवाल, चंद्रशेखर शुक्ल, दिलीप बेंडमाळी, नरेंद्र पाटील, ज्ञानेश्वर राऊत, भिकाजी भुसारी यांच्यासह अनेक शेतकर्यांना या पुराच्या पाण्याचा फटका बसला. नदी काठावरील दोन्ही बाजूला प्रचंड प्रमाणात पाणी घुसल्याने अख्खी पिके खरडून गेली आहेत. हीच परिस्थिती पिंपळगाव सोनारा, शिंदी, मोहाडी, सवडद, राताळी, तांदुळवाडी, मोहखेड, माळखेड, मेरा बु., दरेगाव, हनवतखेड, हिवरा गडलिंग या भागातसुध्दा होती. पिंपळगाव सोनारा येथील नाल्याला पूर आल्याने त्या गावाचा संपर्क तुटला होता. शेकडो विद्यार्थांना शाळा सुटल्यानंतर कित्येक तास अडकून पडावे लागले. दुपारी पाच वाजता पूर ओसरल्यावर त्यांना घरी पोहोचता आले. पिंपळगाव सोनारा येथील माजी सरपंच तोताराम ठोसरे यांनी माहिती दिली की, पिंपळगाव सोनारा गावालगत आलेल्या नाल्याला पूर आल्याने त्या नाल्याचे पाणी शेतकर्यांच्या शेतात घुसले. त्यात कपाशी आणि सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. काही शेत खरडून गेल्याने शेतकर्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे, याची माहिती त्यांनी तत्काळ तहसीलदार अजित दिवटे यांना दिली.
मोहाडी येथील बबनराव रिंढे, विलास आबा रिंढे, ऋषिकेश रिंढे यांची शेती कोराडी नदीच्या दुतर्फा भागात आहे. मोहाडी येथील कोराडी आणि माळखेड भागातून वाहणारे नदीचे पाणी दुतर्फा शेतात घुसले, त्यामुळे उभी पीके वाहून गेली. शिंदी भागातून भोगावती नदी वाहत असताना लेंडी नाल्याचे पाणी या नदीने न घेतल्याने ते पाणी अनेक शेतकर्यांच्या शेतात घुसले, त्यामुळे लेंडी नाल्याच्या दुतर्फा भागातील पिके वाहून गेली आहेत. साखरखेर्डा भागात २००६ नंतर हा भोगावती नदीला आलेला महापूर असून, या पुराच्या पाण्याने महादेव मंदिराला वेढा घातला आहे. पुराच्या पाण्यामुळे ज्या शेतकर्यांचे नुकसान झाले आहे, त्या शेतकर्यांच्या बांधावर जाऊन वस्तूनिष्ठ सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी, कोणत्याही शेतकर्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी महसूल विभागाच्या अधिकार्यांनी घ्यावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील, माजी समाज कल्याण सभापती बाबूराव मोरे, माजी सरपंच सुमनताई जगताप, माजी उपसरपंच रामदाससिंग राजपूत, माजी सरपंच चंद्रशेखर शुक्ल, पिंपळगाव सोनारा येथील माजी सरपंच तोताराम ठोसरे, शिबंदीचे सरपंच साधना अशोक खरात यांनी केली आहे.