जूनमधील अतिवृष्टीच्या पीकनुकसानीपोटी अमरावती विभागाला आले ८६ कोटी!

admin 5 Min Read
5 Min Read

– बुलढाणा जिल्ह्याला मिळाले ७४ कोटी!
– ढगफुटीसदृश पावसाचा मेहकरसह लोणार, शेगाव तालुक्यांना बसला होता सर्वाधिक तडाखा!
– मेहकर तालुक्यातील ६५ हजार हेक्टरवरील पीकनुकसानीपोटी ६८ हजार शेतकर्‍यांना ५५ कोटींचे होणार वाटप!
– आमदार सिद्धार्थ खरातांच्या विधानसभेतील पाठपुराव्याला यश!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – गेल्या जून महिन्यात अमरावती विभागात अतिवृष्टी व पुरामुळे जवळपास एक लाख हेक्टरच्या वरील शेतीपिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी राज्य सरकारकडून ८६ कोटी २३ लक्ष रूपये वितरीत करण्यास काल, दि. ६ ऑगस्टला मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याला ७४ कोटीचा निधी मिळाला आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात ढगफुटीसदृश पावसामुळे सर्वाधिक ७० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात मेहकर तालुक्यातील ६८ हजार शेतकर्‍यांना ६५ हजार हेक्टरवरील पीक नुकसानीपोटी जवळपास ५५ कोटी ७५ लक्ष रूपये निधी मंजूर झाले असून, सदर मदतीचे वाटप लवकरच करण्यात येणार आहे. यासाठी मेहकर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी आताच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात याबाबतचा प्रश्न चांगलाच लावून धरला होता. यानिमित्ताने त्यांच्या प्रयत्नाला फळ आल्याचे दिसून येते आहे. विशेष म्हणजे, मेहकरसह लोणार, शेगाव या तालुक्यांतील पीक नुकसानीबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’नेही वस्तुनिष्ठ व स्वयंस्पष्ट वृत्त वेळोवेळी प्रकाशित करून सरकारचे लक्ष वेधले होते.

गेल्या जून महिन्यात अमरावती विभागात अतिवृष्टी व पूर यामुळे पिके पाहून गेली होती तर काही भागात जमीन खरडून गेली. तर कुठे जमिनीत गाळ येऊन पडल्याने नुकसान झाले. सदर नुकसानीबाबतचा अहवाल विभागीय आयुक्तांनी दि. २९ जुलै रोजी शासनास पाठवला होता व अनुदानाची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे पहिल्या टप्प्यात अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील पीक नुकसानीसाठी ९७७८५.१३ बाधित क्षेत्रासाठी ८६ कोटी २३ लक्ष ३८ हजार रूपये निधी वितरणास काल, दि. ६ ऑगस्टरोजी शासनाकडून मंजूरी देण्यात आली आहे. यामध्ये अमरावती विभागातील एक लाख ७ हजार ४७२ शेतकरी बाधित आहेत. यामध्ये अकोला जिल्ह्यासाठी ३७९०.३१ हेक्टर बाधीत क्षेत्रासाठी ४०५.९० लक्ष, अमरावती जिल्ह्यातील १३१२.२ हेक्टर बाधीत क्षेत्रासाठी २७५.७९ लक्ष, यवतमाळ जिल्ह्यातील १३०.५० हेक्टर बाधीत क्षेत्रासाठी २५.४५ लक्ष, वाशिम जिल्ह्यातील ५१६२.२८ हेक्टर बाधीत क्षेत्रासाठी ४७१.२१ लक्ष रूपयांचा तर बुलढाणा जिल्ह्यातील ८७ हजार ३९०.०२ हेक्टर बाधीत क्षेत्रासाठी ७४४५.०३ लक्ष इतका निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, २५ व २६ जूनरोजी मेहकर तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. या पावसामुळे मेहकर तालुक्यातील जवळपास ६८ हजार ०५८ शेतकर्‍यांचे ६५६०१.२१ हेक्टरवरील पिकांची नुकसान झाले आहे.९८८ शेतकर्‍यांची ३९३.३० हेक्टर जमीन खरडून गेली आहे तर ४९७० शेतकर्‍यांच्या २५९२.१० हेक्टर जमिनीमध्ये गाळ घेऊन पडल्याने नुकसान झाले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात पीक नुकसानीपोटी ६८ हजार ०५८ शेतकर्‍यांना ६५ हजार हेक्टरवरील पीक नुकसानीपोटी ५५ कोटी ७५ लक्ष रूपये मदतनिधीचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये ८५०० रूपये प्रमाणे दोन हेक्टरपर्यंत मदत दिली जाणार आहे. याबाबत मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी नुकत्याच पार पडलेल्या मुंबई येथील पावसाळी अधिवेशनात सदर नुकसानीसाठी भरीव मदत देण्याबाबतचा मुद्दा चांगलाच पोटतिडकीने लावून धरला होता, तर यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांचीसुद्धा भेट घेटून निधीची मागणी रेटली होती. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नाला फळ आल्याचे दिसून येते आहे. दरम्यान, शेती खरडून, गाळ साचून झालेले शेतीचे नुकसान, पाईपलाइन, विहिरीत खचणेसह इतर शासकीय मालमत्तेचे झालेल्या नुकसानीच्या निधीसाठीदेखील पाठपुरावा सुरूच असल्याचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी सांगितले. पीक नुकसानीसाठीचा मेहकर तालुक्यासाठी ५५ कोटी ७५ लक्ष रूपये मदत निधी प्राप्त झाला असून, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या याद्या तात्काळ सादर कराव्यात, असे निर्देश संबंधितांना दिल्याचे मेहकरचे तहसीलदार नीलेश मडके यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले. आमदार सिद्धार्थ खरात यांच्या मागणीनंतर पालकमंत्री मकरंद पाटील यांनीसुध्दा नुकसानीची पाहणी केली व निधी मंजूरीबाबात कार्यवाही केल्याने आ.खरात यांनी पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांचे आभारदेखील मानले आहे.


दिनांक २५ व २६ जून २०२५ रोजी मेहकर व दिनांक २२ जुलै २०२५ रोजी लोणार तालुक्यात ढगफुटीसदृश अतिवृष्टीमुळे आणि महापुरामुळे शेतकरीवर्गाचे प्रचंड नुकसान झाले होते. शेतजमीन खरडून गेली, विहिरी बुजून गेल्या, सोलार सेट वाहून गेले, फळबागा उद्ध्वस्त झाल्या, घरे, रस्ते, पूल, तलाव आदी पायाभूत सुविधांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीबाबतआ. सिद्धार्थ खरात यांनी विधानमंडळात विविध माध्यमांतून सातत्याने आवाज उठवला होता. तसेच, नुकसानग्रस्त भागाला विशेष मदत पॅकेज मिळावे, अशी जोरदार मागणी केली होती.
Share This Article
Exit mobile version