रविकांत तुपकरांच्या क्रांतीकारी शेतकरी संघटनेला वगळून शुक्रवारी पुण्यात ‘शेतकरी हक्क परिषद’!

admin 4 Min Read
4 Min Read

– बच्चू कडू, राजू शेट्टी, अजित नवले, अजित पाटील, प्रशांत डिक्कर यांच्या उपस्थितीत शेतीप्रश्नांवर होणार चर्चा!

पुणे (खास प्रतिनिधी) – शेतकरी, शेतमजूर यांच्या प्रश्नांना वाचा फोडावी, शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी व शेतीमालाला योग्य हमीभाव मिळावा, या मागणीसाठी राज्यातील शेतकरी नेत्यांनी एकत्रित येत, शेतकरी हक्क परिषदेचे पुण्यात आयोजन केले आहे. विशेष म्हणजे, क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर या एकमेव तरूण शेतकरी नेत्याला वगळून ही परिषद घेतली जात आहे. ही शेतकरी हक्क परिषद येत्या शुक्रवारी (ता. ८) रोजी सकाळी साडेदहा वाजता नवी पेठेतील पत्रकार भवनात होणार आहे, अशी माहिती शेतकरी हक्क परिषदेचे संयोजक महेश बडे यांनी दिली आहे.

महेश बडे म्हणाले, ‘या परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू, शेतकरी नेते व अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव अजित नवले, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार कैलास पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट, ज्येष्ठ पत्रकार रमेश जाधव, शरद जोशी विचार मंचाचे अध्यक्ष विठ्ठलराजे पवार, स्वराज्य पक्ष शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर, आम आदमी पार्टीचे उपाध्यक्ष विजय कुंभार, भारतीय किसान युनियनचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर नलावडे-पाटील, राष्ट्रीय समाज पक्षाचे सरचिटणीस अजित पाटील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. ‘शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, शेतमालाला हमीभाव व त्यावर २० टक्के अनुदान द्यावे, ग्रामीण भागातील घरकुलांकरीता ५ लाख अनुदान द्यावे, शेतकर्‍यांप्रमाणे शेतमजुरांचा अपघाती मृत्यू झाल्यास अर्थसहाय्य द्यावे, शेतमजुरांसाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करावे, पेरणी ते कापणीपर्यंत मजुरीची सर्व कामे ‘मनरेगा’मध्ये घ्यावेत, दुग्ध व्यवसायाचा समावेश त्यामध्ये करावा, रसायनिक खताप्रमाणे शेणखत व सेंद्रीय खताला अनुदान द्यावे, मेंढपाळ व मच्छीमारांसाठी स्वतंत्र धोरण बनवावे, ‘मनरेगा’मधील मजुरी ३१२ रूपयांवरून ५०० रूपये करण्यात यावी, दुधातील भेसळ रोखण्यासह गायीच्या दुधाचा दर ५० रूपये प्रती लीटर, तर म्हशीच्या दुधाचा दर ६० रूपये प्रती लीटर मिळावा, कांद्याचे दर स्थिर राहावेत, निर्यातबंदीचा निर्णय शेतकर्‍यांच्या हिताच्या दृष्टीने घ्यावा, ऊस पिकाला प्रति टन ४३०० रूपयांचा भाव मिळावा. १५ दिवसामध्ये पैसे दिले नाही, तर व्याजासह पैसे वसूल करण्याचे अधिकार स्थानिक यंत्रणेला द्यावेत, अशा विविध मागण्यांवर या परिषदेत चर्चा होणार आहे,’ असे महेश बडे यांनी नमूद केले.

दरम्यान, महेश बडे यांनी रात्री उशिरा कळवले, की या कार्यक्रमाचे निमंत्रण आपण स्वतः रविकांत तुपकर यांना दिले होते. त्यांनी सांगतो सांगतो असं सांगितले, व शेवटपर्यंत काहीच सांगितले नाही.


राज्यातील सर्व शेतकरी नेते एकत्र येऊन ही शेतकरी हक्क परिषद घेत आहेत. परंतु, क्रांतीकारी शेतकरी संघटनेची स्थापना करून राज्यभर शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर लढणारे युवा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना मात्र या शेतकरी हक्क परिषदेपासून बाजूला ठेवण्यात आल्याचे (वायले ठेवल्याचे) दिसून येत आहे. यापूर्वी रविकांत तुपकर यांनी राज्यात तिसरी आघाडी स्थापन करण्याची घोषणा पुण्यातूनच केली होती. त्यासाठी त्यांची बच्चू कडू यांच्यासोबत चर्चाही झाली होती. परंतु, या तिसर्‍या आघाडीचा प्रयोग तुपकरांच्या पातळीवर फिस्कटला व राजू शेट्टी यांनी या आघाडीची मोठ बांधत ती यशस्वी केली. शेतकरी हक्क परिषद ही त्याचीच फलश्रुती मानली जात आहे. रविकांत तुपकरांना जसे बाजूला ठेवल्या गेले, तसेच सदाभाऊ खोत यांनादेखील बाजूला ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, प्रशांत डिक्कर यांच्यासारख्या बुलढाणा जिल्ह्यातील रविकांत तुपकरांच्या विरोधकाला राज्य पातळीवर व्यासपीठ मिळवून देण्याचे काम ही शेतकरी हक्क परिषद करत असल्याचेही जाणवत आहे. तुपकर हे सद्या राजकीय संघर्षातून जात असल्याचे दिसत असून, स्थानिक पातळीवरदेखील त्यांच्यात व त्यांच्या काही निष्ठावंत कार्यकर्त्यांत, विशेष करून चिखलीत मानसिक दुरी निर्माण झाली असल्याचे जाणवत आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत त्यांची भूमिका काय राहणार? व त्यांना मतदार कितपत ‘रिस्पॉन्स’ देणार? हादेखील प्रश्न चर्चिला जात आहे. दुसरीकडे, पुण्यातील शेतकरी हक्क परिषद म्हणजे राज्यभर शेतकरी नेता म्हणून पुढे येण्यासाठी धडपड करत असलेल्या रविकांत तुपकरांना एकटे पाडण्याचा प्रकार ठरत आहे.

Share This Article
Exit mobile version