– आ. श्वेताताई महाले पाटील यांच्यासोबतच्या बैठकीनंतर राज्य सरकार टोल कंपनीस एकरकमी रक्कम देण्यास तयार!
– चिखली-मलकापूर मार्गाचा ताबा पुन्हा नॅशनल हायवेकडे घेणार, व चौपदरीकरणाचा प्रश्न मार्गी लागणार!
चिखली (राजेश लोखंडे) – चिखले ते मलकापूर या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण केवळ तांत्रिक अडचणीमुळे रखडलेले आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी चिखलीच्या विकासकन्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यासोबत महत्वपूर्ण बैठक घेऊन याप्रश्नी आवाज उठविला. त्यावर संबंधित टोल कंपनीला एकरकमी रक्कम देऊन हा महामार्ग पुन्हा नॅशनल हायवडे एथॉरिटीकडे घेऊन रस्त्याचे चौपदरीकरण केले जाईल, अशी निसंदिग्ध ग्वाही, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी आ. श्वेताताईंना दिली. तसेच, बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना निर्देशही दिलेत. त्यासाठी लवकरच सरकार निधी उपलब्ध करून देणार आहे. तसेच, चिखली मतदारसंघातील तब्बल १८३ कोटी रूपयांची देयकेदेखील कंत्राटदारांची सरकारकडे थकलेली आहे. ही देयके देण्याचेही सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी या बैठकीत आश्वासित करून संबंधित अधिकार्यांना तसे निर्देश लगेचच दिलेत. त्यामुळे चिखली-बुलढाणा या महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची सुचिन्हे निर्माण झाली आहेत. विशेष म्हणजे, या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक तथा मंत्रालयातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विद्याधर महाले पाटील यांचीदेखील उपस्थिती होती.
चिखली व मलकापूर तालुकावासीयांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणार्या चिखली-मलकापूर मार्गास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळालेला आहे. मात्र, सदर रस्त्याच्या टोलचे कंत्राट २०३४ पर्यंत असल्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. सदर प्रश्न सोडवण्यासाठी टोल कंपनीस नुकसान भरपाईची रक्कम एकरकमी देऊन रस्त्याचा ताबा नॅशनल हायवेकडे देऊन हा प्रश्न सोडवू, असे मंत्रीमहोदयांनी सांगितले. याशिवाय, चिखली मतदारसंघात पूर्ण झालेल्या विविध कामांची १८३ कोटी रुपयांची प्रलंबित देयके अदा करण्यात येतील, असेही आश्वासित केले. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक तथा मंत्रालयातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विद्याधर महाले पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता गिरीश जोशी, उपसचिव प्रज्ञा वाळके, अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे, कार्यकारी अभियंता जितेंद्र काळे, उप अभियंता दीपक चिंचोले आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मलकापूर ते चिखली हा मार्ग सध्या बीओटी तत्त्वावर बुलढाणा अर्बन बँकेच्या अधिपत्याखाली आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी १२०० कोटी रुपयांची घोषणा यापूर्वीच केलेली आहे. फक्त, राज्य सरकारने बुलढाणा अर्बनला टोलची उर्वरीत रक्कम अदा करणे गरजेचे आहे. हा मार्ग बुलढाणा अर्बनच्या बीओटी तत्त्वातून काढावा लागणार असून, बुलढाणा अर्बनला देय रक्कम राज्य शासनाने दिली, की या महामार्गाच्या चौपदरीकरणाचा गुंता सुटणार आहे. त्यानंतर हा नॅशनल हायवे पूर्ण होऊ शकतो, त्यामुळेच आ. श्वेताताई महाले यांनी सरकारकडे पाठपुरावा सुरू केलेला आहे.

