– डोंगरशेवली गावात कावडयात्रेचे पारंपरिक पद्धतीने आणि जल्लोषात स्वागत!
चिखली (राजेश लोखंडे) – श्रावण महिन्याच्या पवित्र पार्श्वभूमीवर ओंकारेश्वर (मध्यप्रदेश) येथून डोंगर शेवली येथे कावड यात्रा काढण्यात आली. सुमारे तीनशे किलोमीटरहून अधिक अंतर पार करत अनेक शिवभक्तांनी नर्मदा जल कावडीच्या माध्यमातून वाहून डोंगर शेवलीतील शिवमंदिरात जल अर्पण केले. या धार्मिक आणि अध्यात्मिक यात्रेमुळे परिसरात अनोखा भक्तीमय उत्साह निर्माण झाला.
यात्रेची सुरुवात ओंकारेश्वर येथून विधिवत पूजन करून करण्यात आली. ‘हर हर महादेव’ आणि ‘बोल बम’च्या घोषणांनी निनादलेले शिवभक्त जल अर्पणासाठी निघाले. मार्गामध्ये अनेक ठिकाणी स्थानिक नागरिकांनी अन्नदान, जलसेवा आणि विश्रांतीची व्यवस्था केली होती. डोंगर शेवली गावात या कावड यात्रेचे पारंपरिक पद्धतीने आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. गावात विविध ठिकाणी ढोल-ताशा, लेझीम, रांगोळ्या, भगवे ध्वज आणि फुलांची सजावट करण्यात आली होती. महिलांनी आरतीने, फुलांच्या पाकळ्यांनी स्वागत केले. या कावड यात्रेत मंगेश तायडे, शिवप्रसाद सावळे, रवी भुतेकर, ओम सावळे, अमोल राठोड, गौरव हाडे, निलेश जावळे, सतीश सावळे, वैभव सावळे, भागवत बाबा, ऋषी गायकवाड आणि प्रतीक सावळे आदी सहभागी झाले होते. या सर्व शिवभक्तांनी संयम, श्रद्धा आणि सेवा यांचे दर्शन घडवत हा प्रवास पार पाडला. ग्रामस्थांनी यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी मोठा सहभाग दिला. विशेषतः युवक मंडळ, ग्रामपंचायत, महिला मंडळ यांनी एकत्र येत अन्नदान, पाणपोई, तसेच व्यवस्थापनाची उत्कृष्ट आखणी केली होती.
ही यात्रा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरली. युवकांनी दाखवलेली शिस्त, परिश्रम आणि भक्तिभाव हे संपूर्ण गावासाठी प्रेरणादायी ठरले. ओंकारेश्वर ते डोंगरशेवली कावड यात्रा ही श्रावणातील एक भक्तिपूर्ण पर्वणी ठरली. संपूर्ण यात्रेने डोंगरशेवली गावात अध्यात्मिक ऊर्जा आणि एकतेचा संदेश पोहोचवला आहे.

