– युवासेना जिल्हा प्रमुख ऋषिकेश जाधव यांचे मेळाव्यातून शिवसैनिकांना आवाहन
साखरखेर्डा (अशाेक इंगळे) – साखरखेर्डा जिल्हा परिषद सर्कल हे नेहमीकरिता शिवसेनेसाठी सकारात्मक राहिले आहे. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये पुन्हा भगवा फडकवविण्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी सतर्क झाले पाहिजे, असे आवाहन शिंदे सेनेचे युवा जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव यांनी साखरखेर्डा येथील युवासेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना केले.
यावेळी युवासेना जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास खेडेकर, युवासेना नेते योगेश जाधव, सतिश तायडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव मोरे, गंभीरराव खरात, दामुअण्णा शिंगणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप बेंडमाळी, वसुदेव पंचाळ, राहुल काबरा, संदीप मगर, संतोष राजपूत, गोपाल राजपूत, रवी वायाळ, अशोक खरात यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत मागिल २०१९ च्या निवडणुकीपेक्षा ४० हजार मते कमी पडली. नेमकी एवढी मते कमी कशी पडली, यांचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. विधानसभा निवडणुकीत या भागात शिवसेनेला जास्त मते मिळाली आणि जात फॅक्टरमुळे आपला पराभव झाला. या मतदारसंघात जातीचे राजकारण चालते. जातीच्या राजकारणावर निवडणुका होणार असतील तर विकास कधीही होत नाही. विकासाचा फॅक्टर माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी या मतदारसंघात राबविला. आजही त्यांचे काम जातविरहित असते. शिवसेना पक्षात ज्यांनी १० वर्षे तालुका प्रमुख म्हणून पद भूषविले ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन तालुका अध्यक्ष झाले, त्यांनी कधी शिवसेना वाढविली नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शाखा स्थापण केल्या नाहीत. कोठेही त्यांचा संपर्क राहिला नाही. शिवसेनेत असे पदाधिकारी चालणार नाही. जे काम करतात त्यांना पदे द्या, आणि यावेळी साखरखेर्डा आणि शेंदुर्जन जिल्हा परिषद सर्कलवर भगवा फडकला पाहिजे, यासाठी कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी योगेश जाधव, श्रीनिवास खेडेकर, सतीश तायडे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबूराव मोरे यांनी केले. तर संचलन अविदास बंगाळे यांनी केले.