जिल्ह्यास मोतीबिंदूमुक्त करण्याचे उद्दिष्ट सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम!

admin 4 Min Read
4 Min Read

– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे : मोतिबिंदूविरहीत वर्धा अभियानाचे उद्घाटन

वर्धा (प्रकाश कथले) – जिल्ह्यास मोतीबिंदू मुक्त करण्याची सुरु झालेली मोहीम सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम असल्याची मोहोर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उपक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमात बोलताना उठविली. पावसमुळे कार्यक्रमात अडसर आला होता, मंडपात पावसाचे पाणी आले होते, त्यामुळे नागरिकाची गैरसोय झाली होती. तरीदेखील उपमुख्यमंत्र्यांच्याहस्ते मोतिबिंदू विरहीत वर्धा अभियानाचे उद्घाटन झाले. यावेळी १८ आरोग्य उपकेंद्र, ५० खाटांच्या क्रिटीकल केअर ब्लॉक इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. अभियानाच्या पहिल्याच शिबिराला रुग्णांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की मोतिबिंदूचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी साठ-सत्तर वर्षाच्या नागरिकांना मोतिबिंदू व्हायचा, आता पन्नास वर्षाच्या व्यक्तींनादेखील हा आजार होतो. या आजाराच्या शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट आणि त्यासाठी देण्यात येणार्‍या निधीत वाढ करण्याची गरज आहे. वर्धा येथे आयोजित शिबिरातून मोतिबिंदूच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी आयोजित केलेल्या अशा शिबिरांतून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कामे केले जाते, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, येथील चरखा सभागृहात हा कार्यक्रम झाला, कार्यक्रमास मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, पालकमंत्री डॉ.पंकज भोयर, आ.राजेश बकाने, भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर, प्रसिध्द नेत्रतज्ञ माजी खासदार पद्मश्री डॉ.विकास महात्मे, पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, माजी खासदार सुरेश वाघमारे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सरिता गाखरे, किरण पांडव, आरोग्य उपसंचालक शशिकांत शंभरकर, प्रियदर्शनी महिला विकास संस्थेच्या अ‍ॅड.शीतल भोयर आदी उपस्थित होते. अलिकडे मोतिबिंदूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अधिक गतीने मोतिबिंदू शस्त्रक्रिया होण्यासाठी शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी अधिक निधीची तरतूद देखील करावी लागेल. यासाठी मुंबईत वेगळी बैठक घेऊन चर्चा करू, असे श्री.शिंदे म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नागपूर येथून घेऊन येणारे हेलिकॉप्टर वर्धा येथे पोहोचत असतांना पाऊस आणि दृष्यमानता नसल्याने नागपूरला परत गेले. त्यानंतर नागपूर विमानतळावरून ते वाहनाने चरखागृह येथे कार्यक्रमस्थळी पोहोचले. वर्धेतील नागरिक, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ आणि शेतकर्‍यांच्या प्रेमाने मला येथे खेचून आणले, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. मी आणि प्रकाश आबिटकर आमदार असतांना पुढच्या बाकावर बसण्याची संधी कधी मिळेल, अशी चर्चा करायचो आणि आज पुढच्या बाकावर बसून सेवा करण्याची संधी देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी आम्हाला दिली, असे पालकमंत्री डॉ पंकज भोयर म्हणाले. वर्धेला आरोग्य सेवेचा उत्कृष्ट वारसा लाभला आहे. आरोग्य सेवा देतांना वर्धा जिल्हा कुठेही कमी पडणार नाही, असे यावेळी बोलतांना पालकमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले. यावेळी पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने, पद्मश्री डॉ.विकास महात्मे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी प्रास्ताविक केले. मोतिबिंदू विरहीत अभियानांतर्गत सर्व आठही तालुक्यात शिबिरे घेतली जाणार आहे. दोन लाख रुग्ण तपासणी व पाच हजार शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते जिल्हा सामान्य रुग्णालयातील ५० खाटांचे क्रिटीकल केअर ब्लॉक नवीन इमारत बांधकाम, जिल्ह्यात नव्याने मंजूर १८ आरोग्य उपकेंद्र व एका ब्लॉक पब्लीक हेल्थ युनीटच्या नवीन इमारतीचे ई-भूमिपूजन करण्यात आले. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून दिव्यांग विद्यार्थीनींना २५ हजार रुपयांचे किसान विकास पत्र, अंधकाठीचे वितरण करण्यात आले. उपमुख्यमंत्र्यांच्याहस्ते उत्कृष्ट कामासाठी डॉ.विकास महात्मे, मंगेश चिवटे, दुर्गा उत्सव समिती व माहेश्वरी नवयुवक मंडळाचा सत्कार करण्यात आला. मंत्री संजय राठोड यांनी शिबिरातील स्टॉलवर स्वत:ची रक्तदाब तपासणी केली. शिबिरस्थळी सकाळी ९ वाजल्यापासून नागरिकांनी तपासणीसाठी गर्दी केली पावसामुळे त्यांना काहीशा अडचणीचा सामना करावा लागला, शिबिराचे आयोजन आरोग्य विभाग, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे, कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम, वर्धा नेत्र चिकित्सा असोशिएशनच्यावतीने करण्यात आले होते.

Share This Article
Exit mobile version