देऊळगाव कुंडपाळ सिंचन प्रकल्पाला भगदाड; धरण फुटण्याचा धोका!

admin 2 Min Read
2 Min Read

– ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा; परिसरातील गावांत भीतीचे वातावरण!

लोणार (वाजिद खान) – जगप्रसिद्ध लोणार सरोवरापासून जवळच असलेला देऊळगाव कुंडपाळ हा २४०८ दशलक्ष घनमीटर क्षमता असलेला सिंचन प्रकल्प काल (दि.२१) रात्री आलेल्या ढगफुटीसदृश पावसाने शंभर टक्के सातव्यांदा भरला असून, प्रकल्पाच्या मध्यभागी दगडाच्या पिचिंगवर एक मोठे भगदाड पडून त्यातून पाणी वाहत आहे. त्यामुळे सदरचे भगदाड हे आणखी मोठे होण्याचा धोका असून, धरणाची भिंतही कोरल्या जाऊन धरण फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरातील गावांत भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

धरण १०० टक्के भरल्याच्या पार्श्वभूमीवर लघु पाटबंधारे विभागामार्फत ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. मात्र धरण क्षेत्रात पाऊस सुरूच असल्याने पाण्याचा विसर्ग कालव्यातून तर होतच आहे. परंतु सदर छिद्र पडलेल्या मोठ्या बिळातूनही मोठ्या प्रमाणावर पाणी विसर्ग होत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामपंचायतीने तथा शिवछत्र मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नंदू मापारी यांनी भिंतीवरील झाडे झुडपे तोडण्याची व घुशीमुळे तेथील जमीन पोकळ झाल्याबद्दल अनेकवेळा पाटबंधारे विभागाकडे मागणी करूनही पाटबंधारे विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष केल्या गेले, त्यामुळे सदर धरणाची भिंत वृक्ष झाडामुळे केव्हाचीच ठिसूळ बनली असून, धरणातील पाण्याचा दाब लक्षात घेता धरण केव्हाही फुटू शकते, अशी शक्यता निर्माण झाल्याने ग्रामस्थात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाटबंधारे विभागाने तात्काळ उपायोजना कराव्या, अन्यथा होणार्‍या परिणामास पाटबंधारे विभाग जबाबदार राहील, असा इशाराही ग्रामस्थांच्यावतीनेही देण्यात आलेला आहे.


या धरण क्षेत्रात व परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने नदीकाठची हजारो एकर जमिनीवरील पिके उध्वस्त झाली आहेत, आणि त्यामध्ये आणखीन एक नवीन संकट धरण फुटण्याची शक्यता निर्माण झाल्याने ग्रामस्थात भय निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस पाटील आसाराम खोमणे आणि परमेश्वर नरवाडे यांनी धरणाच्या भिंतीतून वाहणार्‍या प्रवाहाबाबत सद्यस्थितीची पाहणी करून वरिष्ठांना माहिती दिली आहे.

जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; लोणार, खामगाव, मेहकर, शेगाव तालुक्यांना झोडपले; लोणार तालुक्यात ढगफुटी!

Share This Article
Exit mobile version