– नुकसानीचा मोबदला मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही; सहदेव लाड यांचा शेतकर्यांना धीर!
बिबी (ऋषी दंदाले) – लोणार तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले असून, चोहीकडे हाहाकार उडाला आहे. एकही लोकप्रतिनिधी, अधिकारी शेतकर्यांना धीर देण्यासाठी आला नसताना क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी तातडीने शेतबांधावर पोहोचत शेतकर्यांना धीर दिला. सरकारकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी आंदोलन करेन, पण स्वस्त बसणार नाही, अशा शब्दांत सहदेव लाड यांनी शेतकर्यांना आधार देण्याचा प्रयत्न करत, नुकसानीची पाहणी केली.
सविस्तर असे, की काल रात्री एक वाजेपासून अचानक लोणार तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहिले व नदी नाल्याचे पाणी शेतात जाऊन शेकडो हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले. पांग्रा डोळे गावांमध्ये काही घरांमध्ये पाणी शिरून संसार उपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर दुसरीकडे तालुक्यातील धाड येते एक शेतकरी पुराच्या पाण्यामध्ये अडकून पडला होता. शेतकर्यांनी टीन शेडवर जाऊन आपले प्राण वाचविले व शेतकर्यांचे शेतातील शेती उपयोगी साहित्य व गुरे ढोरेसुद्धा पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलीत. या सर्व शेतकर्यांना धीर देण्यासाठी व शेतकर्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी पांग्रा डोळे व धाड येथे जाऊन शेतकर्यांच्या शेताची पाहणी करून आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडून नुकसान भरपाईची रक्कम मिळून देण्याचा शब्द देऊन शेतकर्यांना धीर दिला. याप्रसंगी त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.