– माऊलींचे जन्मोत्सव ७५० व्या वर्षानिमित्त माऊलींचे मंदिरात संत तुकाराम महाराज संत पादुकाभेट!
– संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आळंदीत जोरदार स्वागत!
– थोरल्या पादुका मंदिरात पूजा व स्वागत; सोमवारी आळंदीत आषाढी एकादशी
आळंदी (अर्जुन मेदनकर) : आषाढी पायीवारी सोहळ्याअंतर्गत श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वैभवी पादुका पालखी सोहळ्याचे परंपरेने माऊली मंदिरात हरिनाम गजरात आगमन झाले. हजारो वारकरी भाविकांचे उपस्थितीत सोहळा हरिनाम गजरात आळंदीत परतला. यावर्षी लाखो भाविकांचे उपस्थितीत पायी वारी सोहळा राज्यात साजरा करण्यात आला. पंढरीत श्रीविठ्ठल देव भेट , गोपाळपुर काला उरकून श्रींचे वैभवी पादुका पालखी सोहळ्याचे हजारो भाविक, वारकरी, नागरिकांच्या उपस्थितीत हरीनाम जयघोषात अलंकापुरीत आगमन झाले. परंपरेने सोमवारी ( दि. २१ ) आळंदीत आषाढी एकादशी सोहळा हरिनाम गजरात साजरा होत आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आळंदीतील एक दिवसाचे पाहुणचार घेत सोमवारी देहू नगरीकडे परतीचे प्रवासास वाटचाल करेल.
आळंदीत श्रींचे सोहळ्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. रांगोळ्यांचे पायघड्या, पुष्पसजावट करण्यात आली. ठिकठिकाणी माऊली भक्त मंडळांनी श्रींचे पालखीवर पुष्प वर्षाव करीत स्वागत केले. भाविकांना विविध ठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. आळंदीतील प्रथा परंपरांचे पालन करीत श्री नरसिव्ह सरस्वती स्वामी महाराज यांचे मूळपीठ येथे ह,भ.प. अवधूत महाराज चक्रांकित आणि परिवाराचे वतीने पिठलं भाकरी चा महाप्रसाद परंपरेने वाटप करण्यात आला. यासाठी भाविकांनी मोठी परंपरा जोपासत महाप्रसादास गर्दी केली. अनेक दिवसांचे विरहा नंतर श्रींचे पालखी सोहळा आळंदीत येताच येथे चैतन्य अवतरले. मोठ्या ज्ञानभक्तीमय वातावरणात आळंदीकरांचे वतीने सोहळ्याचे स्वागत आळंदी देवस्थान व ग्रामस्थांचे वतीने व्यवस्थापक माऊली वीर, आळंदी नगरपरिषद प्रशासक मुख्याधिकारी माधव खांडेकर, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे विश्वस्त प्रकाश काळे, अध्यक्ष सुरेश वडगावकर, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, श्रीधर कुऱ्हाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, बापूसाहेब पठारे, सतीश नांदुरकर, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे, आजी, माजी पदाधिकारी, विविध सेवाभावी संस्था, संघटना यांचे वतीने करण्यात आले. यावेळी वारकरी शिक्षण संस्थेच्या शालेय मुलांनी रस्त्याचे दुतर्फा उभे राहून तसेच सोहळ्यात धाकट्या पादुका ते आळंदी असा प्रवास करीत सोहळ्याचे हरिनाम गजरात स्वागत केले.या पालखी सोहळ्यात सर्व प्रकारच्या सेवा सुव्यवस्थित आणि सुसज्ज व्यवस्था, भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात देत सोहळ्याचे चोख नियोजन झाल्याने कोणीही आजारी पडले नाही. उत्साही आनंदात पायी वारी करीत सोहळा आळंदीत आल्याचे उपव्यवस्थापक तुकाराम माने यांनी सांगितले.
आळंदी पंढरपूर आनंद वारीत स्वच्छतेचीही वारी करण्यात आली. पंढरपूर वारीमध्ये स्वच्छता अभियानाचा उपक्रम राबविण्यात आला. एक तरी ओवी अनुभवावी याप्रमाणे आयुष्यात एक तरी वारी अनुभवावी. वारीच्या अप्रतिम अनुभूतीची संधी यावर्षी प्रत्यक्षात अनुभवली. त्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जाणवतच होता. एवढ्या मोठ्या विशाल वारीमध्ये आपलं काहीतरी योगदान लाभलं या समाधानाने सर्व सेवक तृप्त झाले होते. स्वच्छता वारीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या सर्व सेवक पदाधिकाऱ्यांचे दिलीप महाराज ठाकरे यांनी आभार व्यक्त केले. या पुढील स्वच्छता मोहीम अधिक मोठ्या प्रमाणात पदाधिकारी साधक, सेवक यांचे उपस्थितीत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोहळ्यात उद्या सोमवारी ( दि. २१ ) आळंदीत आषाढी एकादशी साजरी होत आहे. तसेच संत तुकाराम महाराज यांचा वैभवी पालखी सोहळा आळंदीत एक दिवसाचा मुक्काम आणि पाहुणचार घेत हरिनाम गजरात देहू नगरीकडे मार्गस्थ होणार आहे. यावर्षी श्रींचे पालखी सोहळ्याचे पाठोपाठ संत तुकाराम महाराज यांचा वैभवी पालखी सोहळा आळंदीत प्रवेशला. सोहळ्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, पालखी सोहळ्याचे प्रमुख व विश्वस्त विक्रमसिंह मोरे यांचेसह पदाधिकारी, भाविक उपस्थित होते. आळंदी देवस्थान तर्फे वारकरी संप्रदायातील परंपरांचे पालन करीत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे जोरदार स्वागत करण्यात आले.

