– गरीब माऊलीची ग्रामपंचायत प्रशासनाकडे आर्त हाक; सरपंच, सदस्यांना पाझर फुटेल का?
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – साखरखेर्डा गावात १२०० घरकुल मंजूर झाल्याचा मोठा गवगवा झाला. परंतु, आजही याच गावात कित्येक कुटुंब घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत. साहेब कोठे मिळते हो घरकुल? पण तुम्हाला द्यायला माझ्या जवळ पैसे नाही! अशी विनवणी अनेक गरजु करताना दिसत आहेत. अनेक कुटुंबे घरकुलाच्या आजही प्रतीक्षेत आहेत. एका गरीब माऊलीनेदेखील घरकुलासाठी आर्त हाक दिली असून, सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना तिच्याबद्दल पाझर फुटेल का, असा प्रश्न निर्माण होत आहे.
साखरखेर्डा गावात १२०० घरकुले मंजूर झाली. ग्रामपंचायतीने आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी आपल्या वार्डातील काही कुटुंबाची नावे जाहीर करुन त्यांच्याकडून अर्ज भरून घेतले आहेत. स्वत:च्या नावावर जागा, गाव नमुना आठ, घर टॅक्स भरल्याची पावती, मातीचे, कुडाचे घर हवे असे अनेक नियम त्यात आहेत. आज वार्ड क्रमांक एक, पाच आणि सहामध्ये अनेक कुटुंबे अतिक्रमण करून राहतात. ज्यांना १९८० साली झोपडपट्टी मिळाली होती त्यांची घरे पार खचली आहे. भिंती पडलेल्या आहेत. पावसाळ्यात बसायला जागा नाही. उन्हाळ्यात डोक्यावर छप्पर नाही, हिवाळ्यात थंडी झोपू देत नाही, अशी परिस्थिती काही कुटुंबाची झाली आहे. परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने घरकुलाची योजना कधी आली आणि कधी बंद झाली हेसुद्धा त्यांना माहीत नाही. आज गावात सहज फेरफटका मारताना अनेक घरे पावसामुळे ढासळली आहेत. संपूर्ण घरात पावसाचे पाणी येते, एका कोपर्यात चूल पेटवून पोटाची खळगी भरण्यासाठी एक माऊली दिसली. कारण भाकरी थापून तिला शेतात मजुरीने कामाला जायचे होते. अशी अवस्था त्या माऊलीची होती. घरकुल साठी अर्ज केला का? असे विचारले तर ती म्हणाली कोठे मिळते हो घरकुल! आमच्या गरीबाजवळ साहेबाले द्यासाठी कुठे पैसे आहेत. गरीबाला कोण विचारते! असे गंभीर उत्तर तिने दिले. आज हजारांपेक्षा जास्त घरकुल मंजूर झाले असतील, पण अशा पडक्या अवस्थेत राहातं असलेल्या कुटुंबाकडे मायबाप होऊन ग्रामपंचायतीने लक्ष द्यायला हवे.

