ह्युमनी अळीने शेतीपिके नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा; पंचनामे सुरू!

admin 5 Min Read
5 Min Read

– कृषिमंत्र्यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकार्‍यांनी काढले आदेश; आ. श्वेताताई महाले पाटील यांनी लक्ष्यवेधी मांडल्यानंतर अखेर प्रशासन हलले!
– शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी वेधले होते प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष!

चिखली (राजेश लोखंडे) – सोयाबीन व मका या पिकांवर ह्युमनी अळीचा प्रकोप झाला असून, या अळीने नुकसान झाल्यास कसलीही मदत मिळू शकत नाही. पंचनामेदेखील होणार नाहीत, यामुळे शेतकर्‍यांनी मदतीची अपेक्षा सोडून दिली होती. मात्र याचा सतत पाठपुरावा क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी केल्याने आणि तेवढ्याच तत्परतेने आक्रमक भूमिका घेऊन चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी विधानसभेत विषय लावून धरल्याने, राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अधीक्षक कृषी अधिकारी आणि जिल्हाधिकारी बुलढाणा यांना विशेष बाब म्हणून पंचनामे करण्याचे निर्देशित केले होते. त्यानुसार, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी पंचनाम्याचे आदेश काढले असून, तसे पंचनामे सुरू झाले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाईचा मार्ग आ. श्वेताताई महाले पाटील यांच्यामुळे अखेर मोकळा झाला आहे.

सविस्तर असे, की चिखली तालुक्यात ह्युमनी अळीचा प्रकोप वाढतच असल्याने, त्याचप्रमाणे अनेक गावांतील शेतकर्‍यांची पिके या अळीमुळे उद्ध्वस्त झाल्याने अनेक शेतकर्‍यांनी दुबार पेरणी केली. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. तर याबाबत मार्गदर्शन करूनसुद्धा ह्युमनी अळीवर नियंत्रण मिळवता येत नसल्याचे प्रथमदर्शनी समोर आले होते. याबाबत नुकसान भरपाईची कसलीही तरतूद नसल्याने पंचनामे केले जात नसल्याचा विषय क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी चव्हाट्यावर आणत, या शेतकर्‍यांचे पंचनामे करून अधिवेशनात हा मुद्दा घ्यावा, याबाबत तरतूद करण्यात यावी, शेतकर्‍यांना न्याय द्यावा, अशी मागणी प्रशासनासह चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्याकडे शेतकर्‍यांसह करण्यात आली होती. या मागणीची दखल तेवढ्याच तत्परतेने घेत आ.श्वेताताई महाले पाटील यांनी हा मुद्दा अधिवेशनात उचलून धरला होता. शेतकर्‍यांच्या प्रश्नावर अधिवेशनात आक्रमक होत, ह्युमनी अळीचा प्रश्न शासनदरबारी लावून धरल्याने यावर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तसेच जिल्हाधिकारी बुलढाणा यांना दिले होते. तर पंचनामे होतील मात्र नुकसान भरपाई देण्याची तरतूद नसल्याची ओरड शेतकर्‍यांमधे होत होती. मात्र आता या समस्याचे निवारण झाले असून, विशेष बाब म्हणून पंचनामे करण्याचे आदेश कृषीमंत्री यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जिल्ह्यातील तालुका प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे ह्युमनी अळीला विशेष बाबमध्ये घेतल्याने भविष्यात नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी काढलेल्या आदेशात नमूद आहे, की जिल्ह्यात ह्युमनी अळीच्या प्रादुर्भावामुळे बुलढाणा, चिखली, मोताळा, लोणार व देऊळगावराजा येथे सोयाबीन व मका पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असल्याचे प्राथमिक अहवाल प्राप्त असून, त्यानुसार मंत्री महोदय यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील क्षेत्रीयस्तरावरील बाधित झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करून तालुकास्तरीय संयुक्त स्वाक्षरी अहवाल घेण्याकरिता सूचित केले आहे. सदर पीक नुकसान एनडीआरएफ/एसडीआरएफ अंतर्गत येत नसल्याचे मा. मंत्री (कृषी) महाराष्ट्र राज्य यांना भ्रमणध्वनीवरच अवगत केले असता, विशेष बाब म्हणून अहवाल सादर करणेबाबत सूचना दिलेल्या आहेत. तरी आपणास सूचित करण्यात येते की, ह्युमनी अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतीपिकाचे बाधित झालेल्या नुकसानीचे क्षेत्रीयस्तरावर पंचनामे तात्काळ करून नुकसान भरपाई संयुक्त स्वाक्षरीचा अहवाल या कार्यालयास सादर करण्यात यावा, असे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार, हे पंचनामे सुरू झाले असून, शेतकर्‍यांनी आ. श्वेताताई महाले पाटील व क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांचे आभार व्यक्त केले आहेत.


नुसतेच पंचनामे करून तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार झाल्यास आंदोलन छेडू – विनायक सरनाईक

यापूर्वीसुद्धा असेच शेतीपिकांचे नुकसान झाले होते. प्रशासनाकडून पंचनामे तेव्हा करण्यात आले होते. मात्र शासनाला अहवाल सादर करूनसुद्धा शेतकर्‍यांना तेव्हा नुकसान भरपाई मिळाली नव्हती. यावर्षीचे ह्युमनी अळीचे नुकसान भरून न निघणारे आहे. अनेकांनी दुबार पेरणी केली तरीसुद्धा अळी मेली नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे तातडीने नुसतेच पंचनामे होतील, शासनाला अहवाल जाईल, असे व्हायला नको तर मदत मिळणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांचा एकरी पेरणीचा खर्च मोठ्या प्रमाणात आहे. यावर्षी ते शेतकरी आता सोयाबीन पीक घेऊ शकत नाही. दुसरे पीक त्या जमिनीवर पिकेल की नाही, याची शाश्वती नाही. कारण ही अळी बारा महिने नष्ट होत नाही, असे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे. मात्र नुकसान भरपाई देण्यास दिरंगाई केल्यास किंवा तुटपुंजी रक्कम शेतकर्‍यांना देऊ केल्यास बाधीत शेतकर्‍यांसह तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी दिला आहे.

Share This Article
Exit mobile version