मेहकर (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील नायगाव खुर्द शिवारातील शेतकरी प्रकाश श्रीराम गारोळे यांच्या गट क्रमांक ४४ व ४७ मधील शेतीत घेतलेल्या सोयाबीन पिकावर ह्युमनी अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून आला आहे. या प्रकरणाची दखल घेत तलाठी जय माणिकराव शिरसाट व कृषी सहाय्यक सुषमा डुकरे यांनी शेतात प्रत्यक्ष भेट देत पिकांची पाहणी करून सर्वेक्षण केले.
सध्या अनेक भागांत उघडीप दिल्याने व वातावरणातील बदलामुळे सोयाबीन पिकांवर ह्युमनी अळीचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. शेतकर्यांची पीक सुरक्षित राहावी, यासाठी प्रशासनाकडून वेळेवर उपाययोजना केली जात आहे. गारोळे यांच्या शेतात अळीमुळे पान व खोडांच्या भागात नुकसान झाल्याचे निरीक्षण अधिकार्यांनी नोंदवले. क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे मेहकर तालुका अध्यक्ष गणेश गारोळे यांनी नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी, अशी शासन स्तरावर मागणी केली. या पाहणीदरम्यान कृषी सहाय्यकांनी शेतकर्यांना योग्य कीडनाशक फवारणीसंदर्भात मार्गदर्शन दिले असून, येत्या काळात कीड व्यवस्थापनासाठी अधिक काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले.