महाराष्ट्राच्या विधानभवनाचा आखाडा झाला; आ. गोपीचंद पडळकर व आ. जितेंद्र आव्हाड समर्थक विधानभवनातच भिडले!

admin 5 Min Read
5 Min Read

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व पक्षीय नेत्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त; विधानसभा अध्यक्षांकडे कारवाईची मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – महाराष्ट्राच्या विधानसभेचा आखाडा झाल्याचे अत्यंत दुर्देवी चित्र आज (दि.१७) पहायला मिळाले. विधानभवनाच्या लॉबीत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक भिडले व एकमेकांना जोरदार मारहाण केली. या प्रकाराची गंभीर दखल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली असून, अहवाल मागवण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त करत, ही घटना अत्यंत अशोभनीय आणि चुकीची असल्याचे म्हटले आहे. विधानसभाध्यक्ष आणि विधानपरिषद सभापतींनी यावर कडक कारवाई करावी, अशी मागणीही फडणवीस यांच्यासह प्रमुख नेत्यांनी केली आहे. ही घटना म्हणजे, महाराष्ट्राच्या प्रतिमेला बट्टा असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून, देशभरात राज्याची प्रतिमा डागाळली गेली आहे. आ. जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण झाली असून, आ. गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले याने ही मारहाण केली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून आ. जितेंद्र आव्हाड आणि आ. गोपीचंद पडळकर यांच्यात धुसफूस सुरू होती. त्यानंतर गुरूवारी दोघांचेही कार्यकर्ते विधानभवनात भिडल्याने हाणामारीची घटना घडली. या घटनेची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. विधानभवनात मारामारी करणे योग्य नसल्याचे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे कारवाईची मागणी केली. यावेळी गोपीचंद पडळकर यांच्याबाबत तक्रार करण्यात आल्याची माहिती आहे. तर, राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाचा अहवाल मागवल्याची माहिती आहे. तर, गोपीचंद पडळकर यांनी या घटनेसंदर्भात दिलगिरी व्यक्त केली आहे. या प्रकरणानंतर आ. जितेंद्र आव्हाड हे माध्यमांसमोर आले, त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारताच त्यांनी विचारलं की हल्ला कोणी केला. पत्रकार म्हणाले की पडळकर समर्थकांनी केला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड भडकलेले दिसले. अख्ख्या महाराष्ट्राला दिसले, की हल्ला कोणी केला, आम्हाला यापेक्षा जास्त काही पुरावा द्यायचा नाही. जर तुम्ही विधानसभेत गुंडांना प्रवेश देणार असाल, ते आमच्यावर हल्ला करणार असतील तर आमचे लोक सुरक्षित नाहीयेत. मला शिवीगाळ केली, मारण्याची धमकी दिली, असे आ. आव्हाड म्हणले. हे सगळे मलाच मारण्यासाठी आले होते, असेही ते म्हणाले. विधिमंडळाचे अधिवेशन उद्या संपणार आहे, त्यापूर्वी आदल्या दिवशी विधानसभेत विरोधी पक्षांचा अंतिम आठवडा प्रस्ताव जितेंद्र आव्हाड यांनी मांडला. त्यामध्ये त्यांनी त्यांना काल झालेला वाद, त्यानंतर आलेल्या धमक्यांसंदर्भात माहिती दिली. यानंतर थोड्याच वेळात विधानभवनाच्या लॉबीत आव्हाडांचे कार्यकर्ते आणि पडळकरांचे कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक चकमक व नंतर हाणामारी झाली. दरम्यान, या घटनेबद्दल सर्वस्तरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. नुकतीच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी विधानभवन परिसरात कॅन्टीन कर्मचार्‍याला केलेली मारहाण आणि आता विधानभवनाच्या लॉबीतच झालेली हाणामारी याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, विधिमंडळ परिसरात घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. अशी हिंसक कृत्ये विधिमंडळ परिसरात खपवून घेतली जाणार नाहीत. यासाठी कारवाई करावीच लागेल. याप्रकरणी अहवाल मागितला असून त्यानुसार कारवाई करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट सांगितले. नार्वेकर म्हणाले -या हाणामारीच्या घटनेत ज्यांचा सहभाग होता, त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल. माझ्या अधिकारातसुद्धा जे अधिकार आहेत, त्यानुसार मी कारवाई करणार आहे. विधिमंडळात अशी हिंसक कृत्य होऊ देणार नाही, यासाठी कारवाई करावीच लागेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केली दिलगिरी

या घटनेबद्दल गोपीचंद पडळकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. पडळकर म्हणाले- विधानसभेच्या प्रांगणामध्ये जी घटना घडली, ती अत्यंत दुर्दैवी आहे. याचं अतीव दुःख मला आहे. या सगळ्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पडळकर यांनी याबाबत अधिक बोलणे टाळले, तसेच, माझ्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर मी अधिक प्रतिक्रिया देईन, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. हाणामारी करणारे समर्थक होते का गुंड होते? येथे अशी परिस्थिती निर्माण झाली असेल तर विधानभवनाला अर्थ काय? ज्यांनी या लोकांना पास दिले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मग तो कोणत्याही पक्षाचा असो. ज्यांनी त्यांना पास दिले त्यांचे नाव पुढे आले पाहिजे. शेवटी हा अधिकार अध्यक्षांचा असतो. अध्यक्षांची दिशाभूल केली गेली का? हा पण विषय आहे. पण अशी मारामारी आमदारांना धक्काबुक्की ही गुंडागर्दी आता विधानभवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी सर्व विषय सोडून या गुंडांवर व त्यांच्या पोषिंद्यांवर कडक कारवाई केली पाहिजे. असे झाले तरच तुम्ही मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवण्याच्या पात्रतेचे आहात असे मी म्हणेन, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Share This Article
Exit mobile version