किन्ही सवडदचे लोकनियुक्त सरपंच आकाश बोंडे पायउतार; ग्रामपंचायत सदस्यांनंतर ग्रामस्थांचाही अविश्वास!

admin 2 Min Read
2 Min Read

– तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्थांचे मतदान; सरपंचांच्या बाजूने ९६ तर विरोधात पडली १५८ मते!

चिखली (राजेश लोखंडे) – थेट जनतेतून निवडून आलेल्या किन्ही सवडद येथील सरपंच आकाश बोंडे यांच्याविरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव पारीत केला होता. परंतु येथील सरपंच थेट जनतेतून निवडून आल्यामुळे अविश्वास प्रस्तावावर गावातील जनताच निर्णय घेईल, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्यानुसार, चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली असता, सरपंचांच्या विरोधात १५८ ग्रामस्थांनी मतदान केले तर सरपंचांच्या बाजूने केवळ ९६ मतदान झाले. त्यामुळे ग्रामपंचायतीचा अविश्वास ठराव पारीत झाल्याने सरपंच बोंडे यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. आज काल, दि.१६ जुलैरोजी किन्ही सवडद येथे टोकन पद्धतीने ही मतदान प्रक्रिया पार पडली.

लोकनियुक्त सरपंच सरपंच आकाश बोंडे यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव पारीत केला होता. परंतु, जनतेतून सरपंच निवडून आल्यामुळे फक्त ग्रामपंचायत सदस्य यांच्या अविश्वास प्रस्तावामुळे सरपंच पायउतार होत नाही, त्यासाठी गावातील जनतेचे मतदेखील तितकेच महत्वाचे असते. त्यामुळे मतदान प्रक्रिया राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्यानुसार, काल दि.१६ जुलै रोजी मतदान प्रक्रिया सकाळी नऊ वाजेच्या सुमारास सुरु झाली, ज्या मतदारांचे नाव ग्रामपंचायत मतदारयादीत आहे, अशा ग्रामस्थांना आधारकार्डची पडताळणी करून जिल्हा प्राथमिक शाळेच्या आवारात सोडण्यात आले. यामध्ये २६३ मतदारांनी आपला सहभाग नोंदविला, त्यापैकी ९६ मतदारांनी सरपंच यांच्या बाजूने मतदान केले, तर १५८ मतदारांनी सरपंच यांच्याविरोधात मतदान करून अविश्वास प्रस्ताव संमत केला. तर ९ मतदारांनी तटस्थ भूमिका घेतली. यामुळे तहसीलदार संतोष काकडे यांनी सरपंचांवर अविश्वास पारित झाल्याचे जाहीर केले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी संतोष काकडे, उदयनगर मंडळ अधिकारी सौ. सवडतकर, तलाठी डी. एस. गीते, ग्रामपंचायत सचिव निवास पाटील यांच्यासह महसूल व पंचायत समिती कर्मचारी यांनी ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली. यावेळी अमडापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Share This Article
Exit mobile version