– डॉ. विकास मिसाळ, सतिश पाटील भुतेकर यांच्या आक्रमक भूमिकेनंतर बांधकाम विभागाकडून ठेकेदारावर ‘प्रेशर’ वाढले!
– रखडलेले रस्ताकाम तातडीने पूर्ण करा, अन्यथा पुन्हा आंदोलन उभारू – डॉ. विकास मिसाळ यांचा इशारा
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) – देऊळगाव घुबे ते शेळगाव आटोळ या रस्त्याचे काम अतिशय संथगतीने सुरू असून, हे काम वेगाने करण्यात यावे, तसेच हा रस्ता सद्या जीवघेणा बनलेला असल्याने ‘धोक्याचे स्पॉट’ तातडीने दुरूस्त करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. विकास मिसाळ, चिखली तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा इसरूळचे सरपंच सतिश पाटील भुतेकर यांनी केली होती. या शिवाय, या रस्त्याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’नेदेखील वारंवार वृत्त प्रकाशित करून हा गंभीर व धोकादायक बनलेल्या रस्त्याचा प्रश्न उचलून धरला होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने संबंधित ठेकेदाराला तंबी देऊन या रस्त्याच्या कामाची डागडुजी करत, रस्ताकामालादेखील सुरूवात केली आहे.
या रस्त्याच्या कामाबाबत संबंधित ठेकेदाराला देयके अदा केली जात नसून, त्यामुळे निधीची मोठी अडचण निर्माण झाली आहे. तरीदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अनिल बडे यांच्या प्रयत्नामुळे व नागरिकांच्या समस्या लक्षात घेता, या रस्त्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर या रस्त्याच्या कामाला मोठे ग्रहण लागले असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत या भागातील नागरिकांनी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे हात बळकट केले नाही तर मात्र रस्त्याचे काम आणखी रखडण्याची चिन्हे आहेत, अशी या भागातील जनभावना आहे.

