– पंढरपूर वारी करून परतणार्या वृद्ध दाम्पत्याला पावसात अडचण; तहसीलदाराने स्वतःच्या वाहनातून नेले थेट लेकीच्या दारात, प्रसाद म्हणून मिळाल्या पापड्या!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – माणुसकी, संवेदना आणि सामाजिक भान हे अधिकारी पदावरील व्यक्तींमध्ये असेल तर त्यांच्या मानवता कल्याणाचा अनुभव चांगलाच येतो. असाच एक हृदयस्पर्शी अनुभव आज, दिनांक १७ जुलै रोजी सावखेड तेजन फाट्यावर आला. पांडुरंगाच्या दर्शनाने तृप्त झालेले आणि पंढरपूरची वारी करून लेकीच्या घरी निघालेले आजी-आजोबा सावखेड तेजन फाट्यावर भरपावसात वाहनाची वाट पाहात थांबले असता, सिंदखेडराजाचे तहसीलदार अजित दिवटे यांनी त्यांना पाहिले. भरपावसात थरथरणारे या वयोवृद्ध दाम्पत्याला पाहाताच तहसीलदारांनी तत्काळ त्यांना आपल्या वाहनात घेतले, आणि सुखरूप त्यांच्या लेकीच्या घरीही पोहोचवले. त्याबदल्यात त्यांना भरभरून आशीर्वाद अन् ओथांबलेल्या हातांनी दिलेल्या पापड्यांचा प्रसाद मिळाला.
सविस्तर असे, की पांडुरंगाचे दर्शन घेऊन व पंढरपूरची वारी करून एक आजी आणि आजोबा, आपल्या लेकीकडे जाण्यासाठी पिंपळगाव येथे जात होते. त्यांनी जळगाव येथे जाण्यासाठी सावखेड तेजन फाट्यावर वाहन बदलले. परंतु दुर्देवाने पाऊस कोसळत असताना तब्बल दोन तास कोणतेच वाहन मिळाले नाही. अंगावर ओले कपडे, थंडीने थरथरणारे शरीर, पण चेहर्यावर पांडुरंगाच्या दर्शनाचे समाधान आणि भक्तीभाव – हे दृश्य अस्वस्थ करणारे होते. याच वेळी त्या मार्गाने जात असलेले सिंदखेडराजाचे तहसीलदार अजित दिवटे यांची नजर या वृद्ध दाम्पत्यावर पडली. त्यांनी एक क्षणही न दवडता त्यांना आपल्या वाहनात स्थान दिले. दोघांना थेट त्यांच्या लेकीच्या घरासमोर पोहोचवले. या अनुभवाने केवळ आजी-आजोबांनाच नव्हे, तर बघणार्यांनाही माणुसकीचा खरा अर्थ उमगला. पांडुरंगाच्या दर्शनानंतर, तहसीलदाराच्या रूपाने त्यांना जणू पांडुरंगच भेटल्याचा अनुभव आला. लेकीकडे पोहोचल्यावर वृद्ध दांपत्याने तहसीलदारास मनापासून आशीर्वाद दिला — ‘बाळा, पांडुरंग तुझं भलं करो!’ आणि घरातल्या हाताने बनवलेल्या कोरड्या पापड्या प्रसाद म्हणून त्यांच्याकडे दिल्या. या प्रसंगातून समाजातील अधिकारीवर्गातील मानवी संवेदना आणि जबाबदारीचे दर्शन घडते. तहसीलदार यांचे हे कृत्य केवळ एक मदत नव्हे, तर माणुसकीचा आणि लोकसेवेचा आदर्श ठरेल, हे नक्की.