– ग्रामपंचायतीच्या कार्यात सातत्याने सक्रीय असलेल्या सौ. झोरे यांना ग्रामस्थांचा विश्वास; गावात आनंदाचे व उत्साही वातावरण!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – तालुक्यातील आडगावराजा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत सौ. गंगाबाई रुस्तुमराव झोरे यांची एकमताने निवड करण्यात आली. अनेक वर्षांपासून ग्रामराजकारणात सक्रीय भूमिका बजावणार्या सौ. झोरे यांनी यापूर्वीही गावाच्या सामाजिक व प्रशासकीय घडामोडींमध्ये सकारात्मक योगदान दिले आहे. त्यांच्या अनुभवसंपन्न आणि संयमी नेतृत्वगुणांमुळे या निवडीचा गावात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले आहे.
सौ. गंगाबाई झोरे या गेली चार पंचवार्षिकं आडगावराजा ग्रामपंचायतीच्या सत्तेत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या निवडीमुळे ग्रामपंचायतीच्या कारभारात स्थैर्य, विकासाभिमुखता आणि शिस्त येईल, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. त्यांचे पती रुस्तुमराव झोरे हे माळी समाजाचे ज्येष्ठ नेते असून, केवळ राजकीय क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक व अध्यात्मिक कार्यातही अग्रभागी आहेत. विशेषतः वारकरी संप्रदायातील त्यांचा सक्रीय सहभाग उल्लेखनीय असून, त्यांनी भजन, कीर्तन, दिंडी आदी उपक्रमांतून संत वाङ्मयाचा प्रचार आणि प्रसार सातत्याने केला आहे. सौ. गंगाबाई झोरे यांच्या निवडीनंतर आडगाव राजा गावात आनंदाचे वातावरण पसरले असून, राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून त्यांचे अभिनंदन केले. अनेकांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देताना गावाच्या विकासासाठी त्यांचे नेतृत्व फलदायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. उपसरपंचपदाच्या निवडणूक प्रक्रियेला ग्रामपंचायत सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी सरपंच सौ. रंजना संतोष चव्हाण, मावळते उपसरपंच अशोक कहाळे, सदस्य सौ. कासबाई मानसिंग कहाळे, अरुणा निलेश शिनगारे, पांडुरंग शिंदे, श्याम काळे, सौ. लक्ष्मीबाई भागाजी डोंगरे, वैभव जगताप आदी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया ग्रामविकास अधिकारी श्री. जगन्नाथ नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली शांततापूर्ण वातावरणात पार पडली.
गुणवंत विद्यार्थ्याचा गौरव!
याच प्रसंगी आडगावराजा गावातील हर्षवर्धन प्रदीप बिल्होरे या विद्यार्थ्याची आयआयटीसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे गावकर्यांच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या या यशामुळे गावातील तरुण पिढीला नवी प्रेरणा मिळेल, असे मत अनेकांनी व्यक्त केले.