– आ. श्वेताताई महाले यांनी विधीमंडळात आवाज उठविताच कृषीमंत्र्यांकडून तातडीने दखल!
– पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाईची क्रांतीकारी शेतकरी संघटनेकडूनही मागणी
– शेतबांधावर जात क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांच्याकडून अधिकार्यांसह पाहणी व शेतकर्यांना दिलासा!
चिखली (राजेश लोखंडे) – ह्युमनी अळीमुळे शेतकर्यांच्या सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान होत असून, या नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्यांना विशेष बाब म्हणून मदत देण्यात यावी, अशी मागणी चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी आज (दि.१६) विधानसभेत लावून धरली. त्याला तातडीने सकारात्मक प्रतिसाद देत, कृषीमंत्र्यांनी कृषी विभागाला पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, क्रांतीकारी शेतकरी संघटनेनेदेखील आज चिखली तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देत, ह्युमनी अळीने नुकसानीचे तातडीने पंचनामे करून दुबार पेरणीसाठी शेतकर्यांना मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच, संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी अधिकार्यांसह शेत बांधावर जात सोयाबीन पीक नुकसानीची पाहणी करून शेतकर्यांना दिलासा दिला. ह्युमनी अळीने नुकसानीसाठी तरतूद नसल्याने राज्य सरकारला आता विशेष बाब म्हणूनच नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत द्यावी लागणार आहे.
सविस्तर असे, की चिखली तालुक्यात सोयाबीन हे प्रमुख पीक आहे. सध्या या पिकावर ह्युमनी अळीचा प्रादुर्भाव प्रचंड मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. तालुक्यातील अनेक गावातील शेतकर्यांची सोयाबीन या अळीमुळे धोक्यात आले असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. उगवून आलेले सोयाबीन पीक संकटात सापडले असून, त्यामुळे अनेकांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावे, व शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी क्रांतीकारी शेतकरी संघटनेने तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी हा प्रश्न चव्हाट्यावर आणत, कृषी विभाग व शास्त्रज्ञ यांनी पाहणी करून शेतकर्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी केली होती. याची सर्व प्रथम ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने बातमी प्रकाशित केली होती. या शेतकर्यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देत सरनाईक यांनी कृषी विभागाचे कर्मचारी यांच्यासह पाहणी केली असून, नुकसान भरपाई देण्याची कसलीही तरतूद नसल्याचे कृषी विभागाकडून सांगितले जात असल्याने राज्य शासनाने अधिवेशनात हा विषय घेऊन याबाबतची तरतूद करून बाधीत शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी सरनाईक यांनी केली आहे.
दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या शेतावर प्रत्यक्ष बांधावर जात क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांच्यासह कृषी विभागाचे कर्मचारी यांनी पाहणी केली व शेतकर्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. शेतकर्यांचे सोयाबीन पीक पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतकर्याचा यावर्षीचा खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कृषी विभागामार्फत पंचनामे करून शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी, तसेच दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत करावी, अशी मागणी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्यावतीने प्रत्यक्ष बांधावर जात पाहणी करत व कृषी विभागास निवेदन देत करण्यात आली आहे. निवेदन देते वेळी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे राम अंभोरे, भगवानराव मोरे, छोटू झगरे, कार्तिक खेडेकर, सुधाकर तायडे, चेतन शिंदे, आदित्य उन्हाळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकर्यांच्या जीवनात अस्मानी संकटांची सुरू असलेली साखळी शासकीय उपायांनी कमी करावी, यासाठी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी माहितीचा मुद्दा विधिमंडळामध्ये बोलून दाखविला, त्याअंतर्गत चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये समाधानकारक पाऊस पडल्यामुळे सोयाबीन चांगल्या प्रमाणात उगवले आहे. परंतु आता कोळपणीच्या टप्प्यातच सदर पिकावर ह्युमनी अळीचा जबरदस्त हल्ला झाल्याने पीक मुळासकट नष्ट होत आहे. ही अळी मुळाशी व खोडाशी हल्ला करून पीक नष्ट करत आहे. त्यामुळे काही ठिकाणी दुबार पेरणीची वेळ आली आहे. त्यामुळे कृषी विभागामार्फत या अळीचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणचे ताबडतोब पंचनामे करून घेऊन शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी आग्रही मागणी आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी सभागृहाकडे केली. मतदारसंघात ह्युमनी अळी सोयाबीन पिकावर पडली असून, या मुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चिखली विधानसभा मतदारसंघातील विशेषतः १२ गावांमध्ये सोयाबीनचे ह्युमनी अळीच्या प्रादुर्भावामुळे, व कीड रोगामुळे नुकसान झाले असून, तालुक्यातील देऊळगाव धुबे, मेरा बु., कोनड खुर्द, खंडाळा मकरध्वज, शेलगाव जहाँगीर, मुंगसरी, अन्वी, तेल्हारा, मेरा खुर्द, अंत्री खेडेकर, सोमठाणा, दिवठाणा आदी गावांतील शेतात ह्युमनी अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून आला आहे. कृषी विभाग व कृषी शास्त्रज्ञ यांनी पाहणी करून या अळीचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी मार्गदर्शन केले. शेतकर्यांनी त्यावर कृषी विभागाच्या सल्यानुसार डवरणी, स्प्रिंकलर लावणे, औषधी फवारणी केली तरीसुद्धा अळी नियंत्रणात येत नाही आहे. तसेच शासन निर्णयात किंवा पीकविमा योजनेमध्ये कीड रोगाने, अळीने पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळणे संदर्भात तरतूद नाही. अशा वेळेस निसर्गाच्या प्रकोपामुळे परेशान झालेल्या शेतकर्याला सरकारकडून मदतीचा हात मिळणे गरजेचे असून, या भागातील शेतकरी शासनाकडे आशेने बघत आहे, असे आ. सौ श्वेता महाले यांनी सभागृहाला सांगितले. या ह्युमनी अळीमुळे किंवा कीड रोगामुळे होणार्या नुकसानीचे पंचनामे करून विशेष बाब म्हणून शेतकर्यांना मदत मिळवून देण्यासंदर्भात संबंधितांना आदेश देण्यात यावे, अशी विनंती आ. सौ. श्वेताताई महाले यांनी शेतकर्यांच्यावतीने सरकारला केली. आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी विधिमंडळ सभागृहामध्ये पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन या सदरात हा मुद्दा मांडला, आणि राज्याचे कृषिमंत्री यांनी या मुद्द्याची लगेच दखल घेऊन आमदार सौ श्वेताताई महाले यांना यासंबंधी चर्चा करण्यासाठी आमंत्रण दिले. आमदार सौ. श्वेताताई महाले यांनीही वेळ न दवडता कृषिमंत्री यांची भेट घेऊन त्यांना या अळीमुळे शेतकर्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे संपूर्ण विवरण केले व शेतकर्यांना शासनाकडून मदत मिळावी, यासाठी लेखी निवेदनही दिले. राज्याचे कृषिमंत्री यांनीही शेतकर्यांच्या आवाज बनून आलेल्या आ. सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या निवेदनाला प्रतिसाद दिला. आणि बुलढाण्याचे कृषी अधिकारी मनोज कुमार ढोके यांच्याशी त्वरित दूरध्वनीवरून संभाषण साधत बाधित शेतकर्यांच्या बांधावर जाऊन त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले.
—————–

