– मेहकरातील कर्जमुक्ती जाहीर सभेतून लोकनायक प्रकाश पोहरे यांनी केला सरकारच्या शेतकरीलुटीचा पर्दाफास
– कर्जमुक्ती जाहीर सभेला शेतकर्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!; शेतकरी कर्जमुक्तीचा आवाज मेहकरातून बुलंद!
मेहकर/बुलढाणा (बाळू वानखेडे) – एकीकडे मालाला भाव नसताना दुसरीकडे बियाण्यांच्या किंमती वारेमाप वाढवल्या जात आहेत. शेतकरी चोहीकडून भरडला जात आहे. एकंदरीत शासनाच्या चुकीच्या धोरणामुळेच शेतकर्यांच्या आत्महत्या वाढत आहेत? विदर्भात तर यांचे प्रमाण सर्वाधिक आहे, विशेष म्हणजे सरकारला याचे कोणतेही सोयरसुतक नाही, अशी खंत व्यक्त करत, खासदार, आमदार यावर मात्र चकार शब्दही बोलायला तयार नाहीत. तर फक्त तोरण व मरणदारी हजेरी लावतात अन् आपणही तेवढ्यातच खूश राहतो, असाही टोला त्यांनी लगावला. तुमच्याकडे सरकारचे कोणतेच कर्ज नाही हे पहिले समजून घ्या, उलट शासनाने शेतकर्यांचे ६१ लाख कोटी लूटले असून, तेच शासनाकडून घेणे आहेत, याची जाणीव ठेवत यासाठीच भविष्यात आपल्याला नियोजन करायचे आहे, असेही प्रकाश पोहरे ठासून म्हणाले. शेतकर्यांना कसे फसवले यांची जंत्रीच मांडत, केंद्र व राज्य शासनाच्या कारभारावरही त्यांनी चांगलेच आसूड ओढले.
धान्य ठेवायला गोडाऊन नसल्याने आज शासन तीन महिन्याचे धान्य फुकट वाटत सुटले आहे. सदर धान्य मिळेल त्या किमतीत लोक विकत असून, ते पुन्हा संबंधित मिलकडे प्रक्रिया करण्यासाठी जात आहे. शासनाने या फुकट धान्यापेक्षा रोख पाचशे रुपये द्यावे, अशी सूचनाही प्रकाश पोहरे यांनी केली.
प्रवक्ते धनंजय मिश्रा यांनी किसान ब्रिगेडची भूमिका आपल्या मार्गदर्शनात विषद केली. आज महागाई ३५ पटीने वाढली असून, त्या तुलनेत मालाला भाव मात्र नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या होणार नाही यासाठी शासनाने वेळीच उपाययोजना करावी, असे किसान ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अॅड. साहेबराव मोरे यांनी अध्यक्षीय भाषणातून सांगितले. यावेळी माजी सभापती नंदकिशोर बोरे, गंगाधर महाराज कुरूंदकर, शरद वानखेडे, ज्येष्ठ नेते शेणफडराव घुबे, सभेचे आयोजक तथा संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष पांडुरंग पाटील, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप देशमुख आदींनी विचार व्यक्त केले. यावेळी दिवाकर गावंडे, रामेश्वर गावंडे, माजी सहाय्यक गट विकास अधिकारी गजानन पाटोळे, संजय सुळकर, काँग्रेस नेते प्रमोद देशमुख, बी. के. देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य दिलीप खरात, संतोष नरवाडे, जिजाऊ ब्रिगेडच्या सुनिता देशमुख, माजी तालुका कृषी अधिकारी मधुकर काळेसह मान्यवरांची उपस्थिती होती. प्रास्ताविकात जानेफळचे माजी सरपंच तथा सभेचे आयोजक गजानन तात्या कृपाळ यांनी कर्जमुक्ती मेळाव्याबाबतची भूमिका सविस्तर सांगितली. यावेळी प्रकाश पोहरे यांनी आयोजक गजानन तात्या कृपाळ व पांडुरंग पाटील यांची तोंड भरून स्तुतीदेखील केली. सभेचे सूत्रसंचलन ज्येष्ठ पत्रकार सिद्धेश्वर पवार तर उपस्थितांचे आभार पांडुरंग पाटील यांनी मानले. कर्जमुक्ती सभेला बहुसंख्य शेतकर्यांसह विविध पक्ष तसेच संघटनांचे पदाधिकारीसुद्धा आवर्जुन उपस्थित होते.

