‘जनसुरक्षा नव्हे, हा सरकारसुरक्षा कायदा!’; डॉ. शिवानंद भानुसे यांचा संतप्त आरोप!

admin 2 Min Read
2 Min Read

– या कायद्यामुळे लोकशाहीचे गाळू सुटणार; प्रसारमाध्यमांपासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांवर होणार गदा!
– ब्रिटिशांच्या रोलेट अ‍ॅक्टपेक्षाही अधिक भयावह कायदा; महाराष्ट्रात हुकूमशाही आणण्याचा डाव; राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉ. भानुसे यांची संतप्त प्रतिक्रिया!

छत्रपती संभाजीनगर /सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – महाराष्ट्र सरकारने मांडलेला तथाकथित जनसुरक्षा कायदा म्हणजे राज्यातील लोकशाही व्यवस्थेवर आघात असून, हा कायदा लोकशाहीची गळचेपी करणारा काळा कायदा आहे, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी केला आहे.

‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना डॉ. भानुसे यांनी सांगितले की, ‘हा कायदा सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्यमांवर निर्बंध लादणारा असून सामान्य जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट गदा आणतो. यामुळे सरकारच्या विरोधात आवाज उठवणेही गुन्हा ठरेल.’ भारतीय संविधानाने दिलेले मूलभूत अधिकारच या कायद्यामुळे निष्प्रभ होणार असून, कोणतेही आंदोलन, उपोषण अथवा निषेध व्यक्त करणं कठीण होणार असल्याचा गंभीर इशारा त्यांनी दिला.

‘स्वातंत्र्योत्तर भारतात एवढा कठोर कायदा पूर्वी कधीही आलेला नाही. ब्रिटिशांनी आणलेला रोलेट अ‍ॅक्ट जरी कडवट असला, तरीही हा कायदा त्याहीपेक्षा भयंकर आहे,’
— डॉ. शिवानंद भानुसे

हा कायदा जनतेच्या सुरक्षेसाठी नाही, तर सत्ताधार्‍यांच्या सुरक्षिततेसाठी आहे, असा आरोप करत, डॉ. भानुसे यांनी सर्व पक्ष, सामाजिक संघटना आणि जनतेला एकत्र येऊन या कायद्याविरोधात रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले. ‘हा कायदा रद्द होणं अत्यावश्यक आहे. अन्यथा महाराष्ट्रातील लोकशाही, संविधान आणि सामान्य जनतेचे भविष्य अंधारात लोपेल,’ असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

Share This Article
Exit mobile version