– उद्या सिंदखेडराजात राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचा शेतकरी व स्थानिकप्रश्नी भव्य मोर्चा – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे होणार जोरदार शक्तीप्रदर्शन
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असाच सामना रंगण्याची चिन्हे दिसून येत असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे आणि आमदार मनोज कायंदे असाच सामना पुढील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये पाहावयास मिळणार आहे. उद्या, दि. १४ जुलैरोजी शेतकरी व स्थानिक प्रश्नी निघणारा मोर्चा म्हणजे जनमत चाचणीची लिटमस टेस्ट ठरणार असून, त्यातून पुढील दिशा निश्चित करण्याची रणनीती आखली जाणार आहे. राजकारणात जोपर्यंत डॉ.राजेंद्र शिंगणे आहेत, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आपली दुकानदारी चालू शकते. याचा काहिसा अंदाज आल्याने अनेक स्थानिक नेत्यांनी आपला मोर्चा डॉ.राजेंद्र शिंगणे यांचेकडे वळवला आहे. त्यामुळे १४ जुलैला झलक आहे, बाकी पिक्चर अभी बाकी है!
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात ३० वर्षात डॉ. राजेंद्र शिंगणेविरुद्ध शिवसेना अशीच लढत झाली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले होऊन डॉ.राजेंद्र शिंगणे यांची म्हणजे शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमदार मनोज कायंदे, अॅड. नाझेर काझी यांची राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन भाग राष्ट्रवादी काँग्रेसचे झाले आहे. विशेष म्हणजे, गेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने १ लाख ४४ हजार एवढे मतदान घेऊन आपली पवार यांची ताकद दाखवून दिली आहे. शिवसेना शिंदे गटासोबत भाजप असूनही केवळ ६० हजारांवर थांबली आहे. मागील काळात सिंदखेडराजा मतदार संघातील ११ जिल्हा परिषद सर्कलपैकी सहा जिल्हा परिषद सर्कलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. दोन – दोन ठिकाणी भाजप आणि काँग्रेसचे सदस्य होते. तर एक अपक्ष म्हणून होता. दोन्ही पंचायत समितीमध्ये सभापती डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या गटाचे असताना लोणार पंचायत समितीमध्येही सत्तेत वाटेकरी होते. मागील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक होताच डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी भाजपासोबत युती करुन सिंदखेडराजा पंचायत समितीवर आपला सभापती बसविला होता. शिवसेनेचे तीन आणि भाजपचे तीन सदस्य असताना त्यांनी गेम खेळला आणि सत्ता मिळवली होती. त्यानंतर लगेच पुढील सभापती निवडणुकीत भाजपाला बाजूला ठेवून शिवसेना जवळ करीत पुन्हा सभापतीपदी आपल्या पक्षाचा सदस्य बसविला. या मतदारसंघात केव्हा काय खेळी खेळल्या जाईल, हे कोणालाच कळत नाही. विधानसभा निवडणूकपूर्वी डॉ.राजेंद्र शिंगणे विरुद्ध डॉ.शशिकांत खेडेकर असाच सामना होणार अशी हवा निर्माण झाली होती. आजपर्यंत ज्यांनी डाव टाकले, त्याच्याविरुद्ध त्याच्याच मुशीत वाढलेला डाव टाकेल असे वाटत नव्हते. झाले तेच शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांनी डॉ.राजेंद्र शिंगणेविरुद्ध डाव टाकला. डाव टाकताना चक्क काँग्रेस घराण्यातील उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची उमेदवारी मिळवून अॅड.नाझेर काझी असा काही डाव खेळेल असे वाटले नव्हते. नाझेर काझी यांनी एका दगडात तीन पक्षी मारले. एक डॉ.राजेंद्र शिंगणे यांना शह, दोन भाजपाची ताकद जी डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या पाठीशी होती ती कमी करणे आणि तीन डॉ.शशिकांत खेडेकर यांना अंधारात ठेवून मनोज कायंदे यांचा अर्ज दाखल करणे. आज मनोज कायंदे यांची खरी ताकद भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा मतदार हीच आहे. अॅड. नाझेर काझी यांची राष्ट्रवादी सोबत आहेच. परंतु, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांनी स्वतंत्र निवडणूक लढविली आणि शिवसेना शिंदे गटाने स्वतंत्र निवडणूक लढविली तर डॉ.राजेंद्र शिंगणे हे सर्वांना भारी पडू शकतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आजच मैत्रीचा हात पुढे करून शिवसेना (ठाकरे) गटाला सोबत घेऊन फिरत आहेत. काही भागात काँग्रेस सोबत असली तरी मतदारसंघात तळ्यात मळ्यात अशीच भूमिका त्यांची दिसते. १४ जुलैरोजी शासनाच्या विरोधात त्यांचा मोर्चा आहे. त्या मोर्चात शिवसेना (ठाकरे) सहभागी होणार आहे. काँग्रेसही सहभागी होणार आहे. त्यामुळे जोपर्यंत डॉ.राजेंद्र शिंगणे यांची साथ आहे तोपर्यंत सत्तेचे गणित जुळते. असा विश्वास अनेकांना आहे. उद्या मोर्चात कोण सहभागी होणार याकडे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गटाचे लक्ष लागले आहे.