रेतीतस्करांना दणके सुरूच! एकाच दिवशी तीन ठिकाणी धडक कारवाई; टिप्पर-ट्रॅक्टरसह ५ ब्रास रेती जप्त!

admin 2 Min Read
2 Min Read

– सिंदखेडराजा महसूल प्रशासनाचा दणका; वाळूतस्करांचे धाबे दणाणले!

सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – तालुक्यात अवैध रेती माफियांच्या बेकायदेशीर धंद्याला प्रशासनाने जोरदार चपराक दिली आहे! महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत आज, दिनांक १३ जुलै रोजी अवघ्या एका दिवसात तीन ठिकाणी छापे टाकत, तब्बल ५ ब्रास रेती, दोन टिप्पर आणि एक ट्रॅक्टर जप्त केल्याने माफियांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

आज दिनांक १३ जुलै रोजी, प्रा. संजय खडसे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार अजित दिवटे यांच्या स्पष्ट आदेशावर गस्तीवर असलेल्या महसूल पथकाने या कारवाया केल्या. तिघांही घटनांमध्ये वाहनचालकांनी रेती वाहतूकसाठी कोणताही परवाना सादर न केल्यामुळे, ही वाहतूक बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले. सिंदखेडराजा शहरात पहिला दणका गस्तीवर असलेल्या पथकाने २ ब्रास एमएच २८ बीबी ८२९९ क्रमांकाचे रेतीने भरलेला टिप्पर पकडला. या टिप्परला सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात अटकाव करण्यात आला. तर दुसरी कारवाई ताडशिवणी गावात अरूण गायके यांच्या मालकीचे एमएच २८ बीक्यू २७५७ हे २ ब्रास रेती घेऊन जाणारा दुसरा टिप्पर आढळला. प्रशासनाने तत्काळ कारवाई करत वाहन किनगाव राजा पोलिस ठाण्यात जमा केले. दुसरबीड येथे तिसरा शेख गणी शेख रफीक यांच्या मालकीचा विना नंबरचे ‘रेती ट्रॅक्टर’ जेरबंद करण्यात आला. रेतीने भरलेला ट्रॅक्टर गुप्तपणे वाहतूक करत असताना पथकाने अडवून ट्रॅक्टरसह रेती किनगाव राजा पोलिस ठाण्यात जप्त केली. या तीव्र आणि निर्णायक कारवायांमध्ये ग्राम महसूल अधिकारी वसुदेव जायभाये (जऊळका) व एस.जी. पांडव (दुसरबीड) यांनी आघाडी घेत प्रशासनाच्या वतीने दमदार भूमिका बजावली. या तिहेरी कारवाईनंतर महसूल प्रशासनाने ठाम शब्दांत सांगितले की,’तालुक्यात अवैध रेती वाहतूक करणार्‍यांवर अजिबात दयामाया दाखवली जाणार नाही.तसेच कोणताही राजकीय दबाव किंवा हस्तक्षेपाला न मानता कठोर कारवाई सुरू राहील’, अशी प्रतिक्रिया ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना अजित दिवटे तहसीलदार सिंदखेडराजा यांनी दिली. तसेच महसूल विभागाच्यावतीने नागरिकांनाही आवाहन करण्यात आले आहे की, अवैध रेती वाहतूक दिसल्यास त्वरित प्रशासनाला माहिती द्यावी. या कारवायांनंतर नागरिकांमध्ये समाधान व सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ‘अशा प्रकारच्या कारवाया नियमित झाल्यास अवैध रेती वाहतुकीला लगाम बसेल,’ असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे.

Share This Article
Exit mobile version