– मुख्यमंत्र्यांच्या विदर्भातच शेतकरी आत्महत्यांचे विदारक चित्र; नापिकी, डोक्यावरील कर्जांनी विदर्भात मृत्यूचे तांडव!
– मागील सहा महिन्यांत ५२७ शेतकर्यांनी संपविले जीवन!
अकोला/मुंबई (पुरूषोत्तम सांगळे) – पश्चिम विदर्भ म्हणजे वर्हाडात गेल्या सहा महिन्यांत तब्बल ५२७ शेतकर्यांनी आत्महत्या करून जीवन संपवले आहे. अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा व अकोला जिल्ह्यात हे मृत्यूचे तांडव सुरू असून, दर आठ तासाला एक शेतकरी आत्महत्या करत असताना, राज्यातील महायुती सरकारला मात्र त्याचे काहीही सोयरसुतक नसल्याचे दुर्देवी चित्र आहे. सर्वाधिक आत्महत्या या यवतमाळ जिल्ह्यात असून, नापिकी, वांझोटी ठरलेली पीकविमा योजना, डोक्यावर साचलेला कर्जाचा डोंगर आणि सरकारचे शेतकर्यांप्रती उदासीन धोरण या कारणांमुळे या शेतकरी आत्महत्या सुरू आहेत. राज्यातील, विशेष करून विदर्भातील शेतकरी सातबारा कोरा होण्याची वाट पाहात आहेत. त्यांच्याकडे बँकांचे थकित कर्ज भरण्यासाठी पैसेच नाहीत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने कर्जमाफीसाठी समिती गठीत केली, व ‘आम्ही अशा शेतकर्यांना कर्जमाफी देऊ, की ज्यांना खर्याअर्थाने कर्जमाफीची गरज आहे’, असे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. तेंव्हा ते कोणते निकष लावतात? की पुन्हा एकदा जाचक अटी व शर्तीची फसवी कर्जमाफी जाहीर करतात? यामुळे शेतकरी धास्तावलेला आहे.
विदर्भात शेतकरी आत्महत्यांचा उद्रेक झाला असताना राज्यातील महायुती सरकार मात्र शेतकर्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकरी कर्जमाफीवरून शेतकर्यांच्या जीवाशी खेळले जात आहे. गेल्या २५ वर्षात विदर्भातील अमरावती (५४७७), यवतमाळ (६३५१), अकोला (३२०७), वाशिम (२१०७) व बुलढाणा (४५३२) या जिल्ह्यांत २१ हजार ५७४ शेतकरी आत्महत्या झाल्या असून, म्हणजेच दरदिवशी सरासरी तीन शेतकरी आत्महत्या विदर्भात होत आहेत. शेतकरी आत्महत्यांचे हे सत्र कुठल्याही परिस्थितीत थांबायला तयार नाही, याला कारण केवळ सरकारी धोरण आहे. शेतकर्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर उतरविला जात नाही, अवैध सावकारी बोकाळली असून, बँका शेतकर्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत. राज्य सरकारने दिलेली महात्मा फुले कर्जमाफी योजना फसवी ठरली आहे. तसेच, अतिवृष्टी व दुष्काळी परिस्थिती पाहाता, शेतीपिकांच्या नुकसानीची भरपाई देण्यासदेखील सरकारने ऐनकेन प्रकारे टाळाटाळ केली आहे. तसेच, केंद्र सरकारचे पीकविमा धोरण फसवे ठरले असून, राज्य सरकारने पीकविमा कंपन्यांना नफा कमविण्यासाठी मोकळे सोडले आहे. शेतमालाला उत्पादन खर्चाइतकादेखील भाव नसल्याने शेतकरी आर्थिक नुकसानीत गेला आहे. त्यामुळे वर्हाडातील शेतकरी आर्थिक दारिद्र्यात खितपत पडला असून, उदरनिर्वाहाचे कुठलेही अन्य साधन त्याच्याकडे नसल्याने तो हतबल होऊन आपले जीवन संपवित असल्याचे अतिशय भयावह चित्र वर्हाडात निर्माण झालेले आहे.
विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न सरकारच्या उदासीन धोरणांमुळे निर्माण झालेला आहे. शेतमालाला हमीभावाइतकाही भाव मिळत नाही. शेतमाल उत्पादनात शेतकर्यांची लूट सुरू आहे. कबाडकष्ट शेतकर्यांनी करायचे व मलिदा व्यापार्यांनी लुटायचा असा प्रकार सुरू आहे. बँकांनी पीककर्जासाठी शेतकर्यांना आपली दारे बंद केली आहेत, एवढेच नव्हे तर शेतकर्यांची असलेली अन्य खातीसुद्धा गोठवून किंवा त्यातील रक्कम कर्ज खात्यात वळती केली आहे. पीकविमा योजनांचा फायदा शेतकर्यांना झालाच नाही, कुठल्याही शेतकर्याला नुकसानीइतकीही भरपाई मिळालेली नाही. महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन देऊन शेतकर्यांची मते घेतली, पण सरकार बनवताच शेतकर्यांशी गद्दारी केली. पोलिस खात्याला आत्महत्यांची नोंद आत्महत्या म्हणून न घेता आकस्मिक मृत्यू म्हणून घेण्याच्या सूचना आहेत. असे असताना विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये दर दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या समोर येत आहेत, मात्र या महायुती सरकारला त्याचे काहीही सोयरसुतक नाही. किसान ब्रिगेडने सुरू केलेल्या कर्जमुक्तीचे अर्ज भरण्याच्या अभियानामध्ये दोन महिन्यात आठ लाख शेतकर्यांनी अर्ज भरले, यावरून विषयाची गंभीरता समजून येते. सरकारने कुठल्याही अटी शर्ती टाकण्याचे नाटक न करता, विनाविलंब शेतकरी कर्जमाफी करावी. आजपर्यंत जीवनावश्यक वस्तूचा कायदा वापरून सरकारने ६१ लाख कोटी रूपयांनी शेतकर्यांची लूट केलेली आहे, त्या संदर्भात आम्ही जनहित याचिका लवकरच दाखल करत आहोत. त्यामुळे निवडणुकीत घोषित केल्याप्रमाणे सरकारने अविलंब सातबारा कोरा करावा, अन्यथा या सरकारला फार मोठी किंमत चुकवावी लागेल.
– प्रकाश पोहरे, राष्ट्रीय नेते किसान ब्रिगेड
—————–
अत्यंत विदारक स्थिती महाराष्ट्रातील शेतकर्यांची पुढे आली आहे. हे वास्तव मी सहा वर्षांपासून शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडले आहे. कुणीही हा मुद्दा गांभीर्याने घेतला नाही. विशेषतः २०१४ ते २०२४ या दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे, ३३ हजार शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यातील ६५ टक्के आत्महत्या ह्या विदर्भातील आहेत. त्याला कारणीभूत फक्त देवेंद्र फडणवीस हे आहेत, असे माझे आहे. कारण २०१४ ते २०२४ ह्या काळात विदर्भातील ज्या शेतकर्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत, त्या केवळ छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकर्यांच्या आहेत. ही कर्जमाफी योजना फडणवीस सरकारने अत्यंत घिसाडघाईने व जास्तीच्या अटी व शर्ती लागू करून राबविल्यामुळे विदर्भातील २८ ते ३२ टक्के शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहिले. याच शेतकर्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे सरकारने जी कर्जमाफी दिली, त्यामध्ये फडणवीस सरकारने ज्या शेतकर्यांना कर्जमाफी दिली त्यांनी २०१८-२०१९ या आर्थिक वर्षात पीककर्ज घेतले ते त्यांनी भरले नाही, त्या शेतकर्यांना उद्धव ठाकरेंच्या कर्जमाफीचा डबल लाभ मिळाला. मात्र फडणवीस सरकारने लागू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी योजनेपासून जे वंचित राहिले ते अजूनही वंचित आहेत, व त्यांच्यावर अन्याय झाला आहे. हे शेतकरी अजूनही कर्जमाफीची वाट पाहात आहेत.
– शेणफडराव घुबे, ज्येष्ठ शेतकरी नेते, देऊळगाव घुबे, जि. बुलढाणा
————–

