वर्धा (प्रकाश कथले) – जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पवनार येथील घरांची पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्तांशी संवाद साधला तसेच नुकसानग्रस्तांना सानुग्रह मदतीचे तातडीने वाटप करण्याच्या सूचना केल्या.
यावेळी उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे यांच्यासह तहसीलदार संदीप पुंडेकर तसेच महसूल विभागाचे अधिकारी व तलाठी उपस्थित होते. जिल्ह्यात दिनांक ७ ते ९ जुलै या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. यात जिल्हाभर ठीकठिकाणी शेती, शेतीपिके व घरांचे नुकसान झाले, नुकसानीचा आढावा घेतला होता, आज त्यांनी नुकसानीची पाहणी केली, तसेच नुकसानग्रस्तांसोबत संवाद साधला. पवनार येथे अतिवृष्टीमुळे दिनकर येरुणकर यांच्या घराची पडझड झाली होती. पालकमंत्र्यांनी त्यांच्या नुकसानीची पाहणी करून त्यांना तत्काळ सानुग्रह मदत देण्याच्या सूचना केल्या. अतिवृष्टीत जिल्ह्यातील ५४ महसूल मंडळापैकी ५० मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती. अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आल्याने रस्त्याचे आणि पुलांच्या नुकसानीसह नदीकाठावारी घरांची पडझड झाली होती. पडझड झालेल्यांना सानुग्रह मदत देऊन त्यांना आवास योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना यावेळी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिल्यात. तलाठी, ग्रामसेवक व कृषिसेवक यांच्या मदतीने पडझड झालेल्या घर, गोठे व शेत पिकांचे संयुक्त पंचनामे करुन शासनास अहवाल सादर करावा, अशी सूचना केली. यावेळी उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली.