– ‘सीसीआय’च्या कापूस खरेदी घोटाळ्यात विनायक सरनाईकांच्या तक्रारीवर पणनमंत्र्यांनी दिले होते चौकशीचे आदेश!
– कार्यवाही न झाल्यानेच त्या मुद्द्यांवर आ. अमोल मिटकरी विधीमंडळात आक्रमक; सरकारकडून आता ‘एसआयटी’ चौकशीचे आदेश
अकोला/बुलढाणा (राजेश लोखंडे) – क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते तथा डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी सदस्य विनायक सरनाईक यांनी उघडकीस आणलेला सीसीआयचा कापूस खरेदी घोटाळा विधीमंडळात आमदार अमोल मिटकरी यांनी चांगलाच गाजविला असून, त्यावर राज्य सरकारने एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. यापूर्वी, या घोटाळ्याबाबत सरनाईक यांनी पणनमंत्र्यांकडे तक्रार दाखल करत, चौकशीची मागणी केली होती. पणनमंत्र्यांनी सहनिबंधक अमरावती यांना चौकशीचे आदेश दिले होते. परंतु, हे आदेश धाब्यावर बसवत चौकशी झालीच नाही. त्यामुळे हा मुद्दा अखेर आ. अमोल मिटकरी यांनी अधिवेशनात उपस्थित करताच, आता राज्य सरकारने एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सरनाईक यांनी उघडकीस आणलेला हा कापूस खरेदी घोटाळा विधीमंडळात चांगलाच गाजला आहे.
अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अनियमिततेच्या मुद्यावर मिटकरी यांनी विधान परिषदेत आवाज उठवला. लक्षवेधी सूचना मांडत सरकारचे लक्ष वेधले. त्यांच्या मुद्यांचे गांभीर्य पाहता, पणन खात्याचे मंत्री जयकुमार रावल यांनी ९० दिवसांत चौकशीचे आश्वासन दिले. आमदार मिटकरी यांनी आरोप केला की, अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संचालक मंडळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे वरिष्ठ अधिकारी आणि फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या संगनमतातून मोठी अनियमितता करण्यात आली आहे. विशेषतः कापूस आणि ज्वारी खरेदी व्यवहारात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. कोट्यवधींचा ‘कापूस घोटाळा’ असतानाही प्रशासनाने मूक भूमिका घेतली आहे. या व्यवहारात अकोट बाजार समितीचे संचालक मंडळ आणि प्रशासनातील अधिकार्यांनी संगनमत करून गंभीर अपहार केला आहे. ‘संत नरसिंग महाराज फार्मर प्रोड्युसर कंपनी’च्या माध्यमातून ज्वारी खरेदी प्रकरणातही प्रचंड आर्थिक गडबड दिसून येत असल्याचा संशय व्यक्त केला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी यापूर्वी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री रावल यांनी आदेश दिले होते. मात्र, सात महिन्यांनंतरही अमरावती विभागाचे सहनिबंधक, अकोला जिल्हा उपनिबंधक आणि अकोटचे सहायक निबंधक चौकशीस टाळाटाळ करीत असल्याचेही त्यांनी सभागृहात निदर्शनास आणून दिले. या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार प्रवीण दरेकर, एकनाथ खडसे, सदाभाऊ खोत आणि अनिल परब यांनीही सहभाग घेतला होता.
विनायक सरनाईकांची सीसीआय कापूस खरेदीची मागणी विधानसभेत गाजली!
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी सदस्य तथा क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांच्याकडे अकोट येथील शेतकर्यांनी कापूस खरेदीत भ्रष्टाचार झाल्याची माहिती दिल्याने तेव्हाच या प्रकरणी पणन मंत्री यांच्याकडे या प्रकरणी तक्रार करण्यात आली होती. मात्र मंत्रालय स्तरावरुन चौकशी चे आदेश होवूनही कार्यवाही झाली नव्हती. दरम्यान, यातील शेतकर्यांनी आमदार मिटकरी यांची भेट घेत संपूर्ण प्रकरण त्यांच्या समोर मांडले, तर अकोट बाजार समितीच्या अनेक तक्रारीचा पाढा त्यांच्या समोर मांडल्याने आमदार मिटकरी यांनी सर्व प्रकार चव्हाट्यावर आणला असून, विनायक सरनाईक यांची सीसीआयविरोधातील तक्रार विधानसभेत गाजली, असेच म्हणावे लागेल. विशेष म्हणजे, यावर एसआयटी चाैकशी नेमण्यात आली असून, विनायक सरनाईक यांच्यासह शेतकर्यांनी आमदार मिटकरी यांचे आभार मानत अभिनंदन केले आहे.

