राज्यातील ३३ हजार शेतकर्‍यांनी घेतला गळफास; छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी योजनेपासून अद्यापही असंख्य शेतकरी वंचित!

admin 3 Min Read
3 Min Read

– ‘शेतकरी मरतोय… आणि सरकार आकडे झाकतोय; शेनफड पाटील घुबे यांचा संतप्त सवाल
– बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल ५० हजार शेतकरी आजही कर्जमाफीपासून वंचित!

बुलढाणा/सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – ‘२०१४ ते २०२४ या दहा वर्षांच्या काळात विदर्भातील शेतकर्‍यांसाठी मृत्यूची छाया बनली होती. या काळात ३३ हजारांहून अधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, आणि त्यातील तब्बल ६५ टक्के आत्महत्या एकट्या विदर्भात!’ असा संतप्त आरोप ज्येष्ठ शेतकरी नेते शेनफड पाटील घुबे यांनी केला आहे. त्यांनी सरकारवर ताशेरे ओढत म्हटले की, ‘शेतकरी मरण पावतोय, आणि सरकार आकड्यांच्या मागे लपून बसलंय.’

शेनफड घुबे यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी योजना’वर गंभीर आरोप करत सांगितले की, ‘ही योजना १ एप्रिल २००१ पासून राबवायची होती, मात्र शासन निर्णय क्रमांक ०४१८/प्र.क्र. ५३/२-स दिनांक ९ मे २०१८ नुसार केवळ १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ या कालावधीपुरती मर्यादित करण्यात आली. तीही २३ टप्प्यांत सदोष पद्धतीने राबवण्यात आली.’ या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील सहा लाख शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले. एकट्या बुलढाणा जिल्ह्यातच ८,३५३ शेतकरी सहकारी बँकेकडून लाभ मिळवू शकले नाहीत. १,७०० शेतकरी पुनर्गठनाच्या प्रतीक्षेतच राहिले. ३९,९४६ राष्ट्रीयकृत बँकांचे कर्जदारही वंचित राहिले. यामधून एकूण ४९,९९९ शेतकरी आजही कर्जमाफीपासून वंचित असल्याचे गंभीर वास्तव शेनफड घुबे यांनी मांडले. ही केवळ एक राजकीय टीका नाही, तर शेतकर्‍यांच्या व्यथांचा आक्रोश आहे. आकड्यांच्या खेळातून जेव्हा माणसांचे आयुष्य झाकोळले जातं, तेव्हा सरकारने आत्मपरीक्षण करणे अत्यावश्यक ठरते. कर्जमाफी ही योजना नव्हे, तर शेतकर्‍याच्या जिवाची रेषा आहे – ती मोडली, तर शेतकर्‍याचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त होतो. आता तरी सरकारने हा आवाज ऐकावा, अशी जनतेची आशा आहे.


‘कोरा, कोरा, कोरा!’ – घोषणांची फसवणूक!

‘फडणवीस सरकारने ‘कोरा’ शेतकरी म्हणून जे वर्गीकरण केलं, त्यात दुहेरी लाभ घेणार्‍यांना दोनदा मदत मिळाली. पण ज्यांना एकदाही मदत मिळाली नाही, ते आजही कागद घेऊन सरकारी कार्यालयांत फेर्‍या मारत आहेत,’ असे घुबे म्हणाले. ‘महात्मा फुले कर्जमाफी योजना’ ही फक्त उद्धव ठाकरे सरकारच्या काळात प्रभावीपणे राबवली गेली, त्यामुळे अनेक गरजू शेतकर्‍यांना दिलासा मिळाला. ‘पण फडणवीस सरकारच्या योजनेत अटी-शर्तींच्या गोंधळात आणि प्रशासकीय ढिसाळपणामुळेच लाखो शेतकरी मरणाच्या वाटेवर गेले,’ असा आरोप त्यांनी केला. ‘शेतकर्‍यांच्या सहनशीलतेचा अंत झालाय. सरकार जर अजूनही जागं होणार नसेल, तर शेतकरी आता उठेल, बोलेल आणि हक्कासाठी लढेल. कारण मरण्याच्या आधी एकदा जगून बघायचं असतं!’ अशा शब्दांत घुबे यांनी सरकारला थेट इशारा दिला.

Share This Article
Exit mobile version