ठेकेदाराने रस्ताकामात नाल्या काढल्या नाही; पाणी शेतात घुसून दुबार पेरणी कराव्या लागलेल्या सोयाबीन पिकाची अतोनात हानी!

admin 7 Min Read
7 Min Read

– सोयाबीन पीक पाण्यात; शेतकर्‍यांस नुकसान भरपाई देण्यासह दोषींवर कारवाई करा; विनायक सरनाईक, नितीन राजपूत आक्रमक!
– शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्या, संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्टेड करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा क्रांतीकारी शेतकरी संघटनेचा इशारा!

चिखली (राजेश लोखंडे) – तालुक्यातील राज्य महामार्ग ७५३ए ते मालगणी, सावरगाव, वाघापूर, अंत्रीकोळी, गोदरी, चांधई हा रस्ता करताना ठेकेदाराने रस्त्याला नाल्या न काढल्याने रस्त्यावरचे पाणी शेतकर्‍यांच्या शेतात घुसून शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या भागात एक तर शेतकर्‍यांना दुबार पेरणी करावी लागली. ती पेरणीदेखील या साचलेल्या पाण्याने वाया गेली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांवर मोठे संकट कोसळले आहे. शेतकर्‍यांनी वारंवार विनंती करूनही संबंधित ठेकेदाराने नाल्या काढल्या नाहीत, त्यामुळे शेतकर्‍यांवर ही दुर्देवी वेळ ओढावली आहे. तेव्हा, या शेतकर्‍यांना तातडीने आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, संबंधित ठेकेदाराला ब्लॅक लिस्टेड करण्यात यावे, तसेच या रस्त्याचे कामही निकृष्ट झालेले आहे, त्यामुळे त्याचे बिल अदा करू नये, अशी मागणी पीडित शेतकर्‍यांसह क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांनी केली आहे. अन्यथा, तीव्र आंदोलनाचा इशारादेखील देण्यात आला आहे.

सविस्तर असे, की चिखली तालुक्यातील राज्य महामार्ग ७५३ए ते मालगणी, सावरगाव, वाघापूर, अंत्रीकोळी, गोदरी, चांधई हा रस्ता रूंदीकरणासह सुधारणा करण्याचे काम मंजूर असून, रस्तावर डांबरीकोट करण्यात आला आहे. मात्र या रस्त्याला नाल्या न काढल्याने रस्त्याचे खोदकाम करून काम न करता, रस्ता उंच झाल्याने अंत्री कोळी शिवारातील शेतकर्‍यांनी याबाबतची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभाग व तहसीलदार यांच्याकडे केली होती. मात्र कसलीही दखल घेतली जात नसल्याने याबाबतची माहिती शेतकर्‍यांनी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, नितीन राजपूत यांना दिल्याने सरनाईक, राजपूत यांनी तलाठी, मंडळ अधिकारी यांच्यासमवेत अंत्रीकोळी शिवारातील गट नं २३, २४, २५ची पाहणी केली असता, शेतकर्‍यांनी दुबार पेरणी केलेले सोयाबीन ठेकेदाराने रस्त्याला नाल्या न केल्यामुळे चिभडले असून, या पिकाचे अतोनात नुकसान झाल्याचे व अनेकांच्या शेताला तलावाचे स्वरुप आल्याचे दिसून आले. शेतकर्‍यांचे हे नुकसान हे निसर्ग कोपला म्हणून झाले नसून, ठेकेदाराच्या हलगर्जीमुळे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षीतपणामुळे झाले असल्याचे म्हणत, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, सदरील काम निकृष्टदर्जाचे करण्यात आले असून, केलेला रस्ता उखडायला सुरूवात झाल्याने शासनाचे कोट्यवधी रूपये पाण्यात गेलेच, मात्र शेतकर्‍यांचे पीकसुद्धा अडेलतट्टू ठेकेदारामुळे पाण्यात गेले आहे. त्यामुळे ठेकेदार व संबंधित दोषींवर कारवाई करण्यासह या ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत समावेश करण्यात यावे, शेतकर्‍यांना भरिव नुकसान भरपाई मिळेपर्यंत कसलेही रस्त्याचे बिले अदा करू नये, अशी मागणी शेतकर्‍यांसह राजपूत, सरनाईक यांनी केली आहे.
मालगणी, सावरगाव डुकरे, वाघापूर, अंत्रीकोळी, गोद्री, चांदई रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण डांबरी काम करण्यात आले आहे. कुठलाही रस्ता करतांना शेतकर्‍यांची प्रामुख्याने मागणी असती ती नाल्या करणे, मात्र रस्त्याला नाली करावी ही मागणी होवूनसुद्धा संबंधित ठेकेदार श्री बुधवानी यांनी रस्त्याला नाल्याच केल्या नसल्याने मौजे अंत्रीकोळी शिवारात गट नं २३, २४, २५ मधील शेतकर्‍यांच्या शेतीपिकाचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी शेतकरी सतत पाठपुरावा करीत आहेत. या संदर्भात लेखी तक्रारसुद्धा शेतकर्‍यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग चिखली यांच्याकडे केली आहे. मात्र १५ दिवस उलटूनसुद्धा नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यात आली नाही. तसेच, नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी ही महसूल विभागाची असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदार यांच्याकडून शेतकर्‍यांना सांगितले जात असल्याने या बाबतची माहिती शेतकर्‍यांनी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक, नितीन राजपूत यांना दिल्याने ठेकेदाराच्या हलगर्जीमुळे झालेल्या शेती पिक नुकसानीची पाहणी तलाठी, मंडळ अधिकार्‍यांसह सरनाईक, राजपूत यांनी केली. या शेतकर्‍यांचे यावर्षीचे पिक हातून गेले आहे. विशेष म्हणजे, ठेकेदारास पाण्याची विल्हेवाट लावण्याचे सांगूनसुद्धा दुबार पेरणी केलेले पीक सुद्धा पाण्यात गेले असल्याने या शिवारातील शेतकर्‍यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान दुतर्फा नाल्या न केल्यामुळे झाले आहे. मात्र आठवडा उलटूनदेखील या प्रकरणी कुठलीही कार्यवाही व नुकसान भरपाई मिळण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आले नाही. या शेतकर्‍यांना दुबार पेरणीचे संकट ओढवले असून, दुबार पेरणीनंतर पुनश्च सोयाबीन शेतीपिकाचे नुकसान झाले आहे. आता त्या जमिनीवर पिक घेणे अशक्य झाले आहे. करिता या प्रकरणी संबंधित ठेकेदार यांना ब्लॅक लिस्टेड करण्यात यावे, संपूर्ण रस्ता डांबरीकरण काम अंदाजपत्रकप्रमाणे करण्यात आले नसून, निकृष्ट करण्यात आले असल्याने याचा स्थळ पंचनामा करण्यात येवून सदरील काम उत्कृष्ट दर्जाचे करण्यात यावे, रस्त्याला नाली न काढल्याप्रकरणी शेतकर्‍यांच्या शेती पिक हातून गेल्याने शेतकर्‍यांना मागील वर्षीचे उत्पन्न ग्राह्य धरूण ती रक्कम शेतकर्‍यांना अदा करण्यात यावी, डांबरीकरण काम निकृष्ट केले असल्याने संबंधित कंत्राटदार यांचे कसलेही बिल अदा करण्यात येवू नये, बिल अदा झाल्यास सदरची नुकसान भरपाई ही संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व जबाबदार अधिकारी यांच्यावर निश्चित करण्यात यावी, रस्त्यामुळे पाणी साचणार नाही, यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, सदर मागण्यांची दखल घेऊन दोन ते चार दिवसांत न्याय न मिळाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन शेतकर्‍यांसह छेडण्यात येईल, याची सर्वस्वी जबाबदारी ही जिल्हा महसूल प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग यांची राहील, असे सांगण्यात क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले आहे.


माझ्याकडे एकच काम आहे का? मला नका सांगू काम कसे करायचे.. ठेकेदाराची उर्मट भाषा!

विशेष म्हणजे, रस्ता करतांना संबंधित विभागास भविष्यात शेतीपिकाचे नुकसान होईल, ही बाब शेतकर्‍यांनी निदर्शनास आणून दिली होती. मात्र ठेकेदार यांनी सांगितले की, माझ्याकडे एकच काम थोडी आहे, तालुक्यात अनेक कामे मी केली आहे. त्यामुळे काम कसे करायचे हे मला तुम्हीच काय डिपार्टमेंटने सुद्धा सांगावयाचे काम नाही. डांबरीकरण काम असेच असते. स्वतः आमचे कार्यकारी अभियंता रस्ता डांबरीकरण काम बघून गेले, अशा प्रकारे उत्तरे ठेकेदार देत असल्याने या ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करीत असल्याचा आरोप होत आहे. या ठेकेदाराने तालुक्यात किती कामे केली आणि केलेली कामे उत्कृष्ट आहेत की निकृष्ट, याची चौकशी बांधकाम विभागाने करावी, अशी मागणी विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांनी केली आहे. या उर्मट ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता बुलढाणा यांच्याकडे करण्यात आली आहे.


तहसीलदारांनी दिले कारवाईचे आदेश….

सदरील बाब क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी प्रभारी तहसीलदार गायकवाड यांच्या निदर्शनास आणून दिली. शेतकर्‍यांच्या शेतात पाणी साचणार नाही, शेतकर्‍यांचे नुकसान होणार नाही याची जबाबदारी ठेकेदारावर निश्चित करून या दृष्टीने उपाययोजना करण्याचे आदेश नायब तहसीलदार श्री वीर यांनी उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना दिले आहेत.

Share This Article
Exit mobile version