– मंत्री गिरीश महाजन यांची आझाद मैदानावर आंदोलनस्थळी घोषणा
मुंबई (धम्मप्रिया कांबळे) – राज्यातील सुमारे पाच हजार खासगी विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्याने शासकीय अनुदान देण्याचा निर्णय ऑक्टोबर २०२४ मधील विधानमंडळ अधिवेशनात घेण्यात आला होता. मात्र, त्या निर्णयाला आता दहा महिने उलटूनही प्रत्यक्ष निधीच्या तरतुदीचा कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे या शाळांमधील शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, सरकारच्या दिरंगाईविरोधात विनाअनुदानित शिक्षकांनी गेल्या पाच दिवसांपासून आझाद मैदानार आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला अखेर यश मिळाले असून, भाजप नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून आंदोलनस्थळी भेट दिली, आणि सरकारतर्फे सर्व मागण्या मान्य करण्याची घोषणा केली. तसेच, अधिवेशन संपल्यानंतर खात्यात पगार जमा होईल, असेही त्यांनी सांगितले.
राज्यामध्ये सध्या ५,८४४ अंशतः अनुदानित खासगी शाळा आहेत. यामध्ये ८२० प्राथमिक, १,९८४ माध्यमिक व ३,०४० उच्च माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण ३,५१३ प्राथमिक, २,३८० माध्यमिक व ३,०४३ उच्च माध्यमिक तुकड्या कार्यरत आहेत. एकूण ८,६०२ प्राथमिक शिक्षक, २४,०२८ माध्यमिक शिक्षक आणि १६,९३२ उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या शाळांमध्ये कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पगाराविना काम करत असूनही शाळांचा शैक्षणिक दर्जा टिकवून ठेवण्यात त्यांनी मेहनत घेतली आहे. मात्र शासनाच्या अशा धोरणामुळे त्यांच्या रोजच्या जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. आता केवळ आश्वासनांवर न चालता प्रत्यक्ष निधी वाटपाचे आदेश हवेत, अशी मागणी विना अनुदानित शिक्षकांनी केलेली आहे.
मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, आमची भूमिका सकारात्मक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारला तुमची काळजी आहे. आम्हाला माहिती आहे की, आपण सामान्य कुटुंबातील आहात. तुमची रोजीरोटी ही आहे, त्यामुळे अतिशय धाडसी निर्णय फडणवीसांनी त्यावेळी घेतला. त्यानुसार, २० टक्के, ४० टक्के त्यानंतर ६० टक्के दिले. सरकारी तिजोरीवरील आर्थिक संकटामुळे आमच्याकडून पुढचे टप्पे देण्यास उशीर झालेला आहे. तुम्ही याबाबत वारंवार मागणी करत होता. पण आता तुमचा पगाराचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. आम्हाला तुमच्या खात्यात पगार टाकायचाच आहे, असे गिरीश महाजन म्हणाले. याबाबत तुमच्या शिक्षकांच्या संघटनेच्या पदाधिकार्यांसोबत झालेल्या बैठकीत ठरले आहे. पण या दोन-तीन दिवसात सर्व तांत्रिक बाजू समजावून घेऊन येत्या १८ तारखेला अधिवेशन संपेल, तेव्हा तुमच्या खात्यात पैसे पडलेले असतील. यात कोणताही बदल होणार नाही, अशी ग्वाही गिरीश महाजन यांनी याप्रसंगी आंदोलकांना दिली.
विधीमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर विना अनुदानीत शिक्षकांच्या खात्यात वीस टक्के वाढीव पगार जमा होईल, असं आश्वासन सरकारनं दिलं. मंत्री गिरीश महाजन यांनी आझाद मैदानात शिक्षकांच्या आंदोलनात जाऊन ही घोषणा केली. यापुढे पगाराची तारीख टळणार नाही असं आश्वासनही त्यांनी दिलं. त्याआधी शिक्षकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. चर्चा सकारात्मक झाल्याचं मंत्री महाजन यांनी सांगितलं. सकाळी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी देखील आझाद मैदानात जाऊन शिक्षकांची भेट घेतली होती. मंत्री गिरीश महाजन यांनी घोषणा करताना सांगितले की, “तुम्ही कुणावरही विश्वास रोवू नका. तुमचं काम आम्हीच करणार आहोत. आमच्याशिवाय तुमचं काम कोणी करू शकणारच नाही.” त्यांनी पुढे सांगितले की, दोन-तीन दिवसांमध्ये सर्व तांत्रिक बाजू समजून घेऊन, येत्या अठरा तारखेला अधिवेशन संपेल त्या वेळेला शिक्षकांच्या खात्यामध्ये पगार जमा होईल. यात कोणताही बदल होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

