पाचव्या दिवशीही पावसाची रिपरिप सुरूच; सवडद येथील दोन घरे ढासळली!

admin 2 Min Read
2 Min Read

– जनजीवन विस्कळित, शेतीची कामे खोळंबली!

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – परिसरात गेल्या पाच दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरूच असून, जनजीवन विस्कळित झाले आहे. शेतकर्‍यांची शेतातील कामे खोळंबली आहेत. सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरलेले आहे. तर सतत पावसामुळे सवडद येथील दोन घरे ढासळली आहेत.

शनिवारपासून सूर्यदर्शन झाले नसून, साखरखेर्डा परिसरात पावसाची रिपरिप सुरूच आहे. या पावसामुळे शेतातील विहिरी पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत. शेतात सतत पावसाची रिपरिप सुरू असल्याने दलदल झाली आहे. त्यामुळे शेतातील कामे खोळंबली आहेत. तण वाढत चालले आहे. तण व्यवस्थापन करण्यासाठी तणनाशक फवारणी करुनही उपयोग होत नाही. सततच्या पावसामुळे पिके पिवळी पडू लागली आहे. शेतरस्ता चिखलमय झाला आहे. गावातील रस्तेही दलदल झाली आहेत. डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अगोदरच पावसाळा मे महिन्यात सुरु झाल्याने पावसाचे प्रमाण वाढले आहे. नदी नाले खळाळून वाहत असून, विहिरी पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत. नव्याने ज्यांनी विहिरी खोदल्या आहेत, परंतु, पंचायत समितीमधून एकही हप्ता न मिळाल्याने बहुसंख्य विहिरीचे बांधकाम रखडले आहे. या सततच्या पावसामुळे विहिरीचे पाणी वाढले असून, काही विहिरी प्रवाहीत झालेल्या आहेत. त्या विहिरी ढासळण्याच्या स्थितीत आहेत. पंचायत समितीमधील अधिकारी जाणून बुजून पैसे देण्यासाठी विलंब करीत आहेत. नेमके याचे कारण काय, असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. सवडद येथील सुभाष विठोबा आखरे आणि ग्राम पंचायत सदस्य दत्ता गोविंदराव गाडगे यांची घरे रिपरिप पावसामुळे ढासळली आहेत. याची दखल महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी घ्यावी, अशी मागणी होत आहे.

Share This Article
Exit mobile version