UPDATE :
मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली तातडीने दखल!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने तातडीने या बातमीची दखल घेतली असून, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक तथा वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विद्याधर महाले पाटील यांनी श्रीमती स्वातीताई नागरे यांच्याशी संपर्क साधून, त्यांच्या भावना जाणून घेतल्या. तसेच, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे स्वातीताई नागरे यांनीदेखील समाधान व्यक्त केले होते.
– कैलास नागरे यांच्या बलिदानाकडे सरकारचे दुर्लक्ष; न्याय द्या, मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ द्या, श्रीमती स्वाती नागरे यांनी दिले उपविभागीय अधिकार्यांना निवेदन!
दुसरबीड/सिंदखेडराजा (भगवान नागरे) – महाराष्ट्र शासन युवा शेतकरी पुरस्कारप्राप्त शेतकरी स्वर्गीय कैलास अर्जुन नागरे, रा.शिवणी आरमाळ यांनी शेतकर्यांच्या शेतीला पाणी मिळावे म्हणून दि.१३ मार्च २०२५ रोजी बलिदान दिले. आज त्याला चार महिने पूर्ण झाली तरी त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये केलेला उल्लेख, की माझ्या मुलांचं व कुटुंबाचे पालकत्व मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी स्वीकारावे, आणि ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारल्याची विधानसभेमध्ये घोषणाही केली होती. परंतु, त्याचे पुढे काय झालं? ते अद्याप काहीच आम्हाला कळालं नाही, म्हणून आज (दि.९) उपविभागीय अधिकारी कार्यालय सिंदखेडराजा, तहसील कार्यालय देऊळगावराजा येथे निवेदन देऊन अन्नत्याग आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा श्रीमती स्वाती नागरे यांनी केली आहे. विशेष म्हणजे, स्व. कैलास नागरे यांच्या बलिदानाचा जसा सरकारला विसर पडला तसा प्रशासकीय यंत्रणा, राज्यकर्ते यांनादेखील विसर पडल्याने परिसरातून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, हे वृत्त ब्रेकिंग महाराष्ट्रने प्रसारित करताच, मुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने या संवेदनशील बाबीची दखल घेत, स्वातीताई नागरे यांच्याशी संपर्क साधला, व त्यांच्या भावना जाणून घेत, त्यांनी मागणी केल्याप्रमाणे ठोस मदतीचा शब्द दिला आहे. लवकरच ही मदत त्यांना प्राप्त होणार आहे.
२१ जुलैपासून शिवणी अरमाळ येथे प्राणांतिक उपोषणाचा इशारा
मला व माझ्या मुलांच्या भविष्यासाठी तरी वेळ द्या, नाहीतर मी माझ्या राहत्या घरी शिवणी आरमाळ येथे माझ्या पतीच्या प्रतिमेजवळ अन्नत्याग आमरण उपोषण दिनांक २१ जुलै २०२५ पासून करणार आहे. माझ्या व माझ्या कुटुंबाच्या आरोग्याची सर्व जबाबदारी ही प्रशासनाची असेल, जर बलिदान देऊन न्याय मिळत असेल तर तेहीसुद्धा मी करायला तयार आहे. कारण माझ्या पतीने बलिदान दिल्यानंतर शिवणी आरमाळ येथील धरणावरील सर्व झाडं झुडपे काढण्यात आले. तेही बलिदान दिल्यानंतरच काढण्यात आली. म्हणून राज्य सरकारने माझ्यावर ती वेळ येणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन श्रीमती स्वाती नागरे यांनी सरकारला केले आहे.

