वर्‍हाडी बनून आले अन् छापे मारले; जालन्यात सापडले तब्बल ३९० कोटींचे घबाड!

editor 3 Min Read
3 Min Read

जालना (जिल्हा प्रतिनिधी) : जालन्यामध्ये प्राप्तिकर विभागाने मारलेल्या नियोजनबद्ध छाप्यांत तब्बल ३९० कोटींचे घबाड सापडले आहे. इन्कम टॅक्सचे अधिकारी लग्नाचे वर्‍हाड बनून गेले आणि अचूक छापेमारी केली. लोखंडी गज उत्पादन करणार्‍या कारखानदारांच्या घरावर ही छापेमारी करण्यात आली. यात ५८ कोटींची रोख रक्कम, ३२ किलो सोन्याचे दागिने, हिरेसह १६ कोटींचा ऐवज सापडला आहे. एवढेच नाहीतर ३०० कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रही सापडली आहे. एकूण, ३९० कोटीचे घबाड जप्त केले गेले असून, व्यावसायिकांच्या घरांवर, कार्यालयावर तसेच कारखान्यांवर छापे टाकून आयकर विभागाने ही कारवाई केली आहे.
जालन्यात सापडलेली ३९० कोटींची रक्कम ही बेहिशोबी असल्याचे सांगण्यात येत आहे. छाप्यात सापडलेली रोकड मोजण्यासाठी आयकर विभागाच्या अधिकार्‍यांना तब्बल १६ तासांचा कालावधी लागला. या कारवाईचे औरंगाबाद कनेक्शन असल्याचे समोर आले असून, शहरात तीन ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. राज्यभरातील २६० अधिकारी कर्मचारी हे १२० वाहनांमधून पोहोचले होते. या कारवाईत सापडलेली ५८ कोटींची रोकड ३५ पिशव्यांमध्ये पॅक करण्यात आली होती. अधिकार्‍यांनी जेव्हा त्याचा उलगडा केला तेव्हा अक्षरश: नोटांची भिंतीच तयार झाली होती. या कारवाईमध्ये औरंगाबादेतील प्रख्यात लँण्ड डेव्हलपर्स आणि व्यापारी यांचादेखील समावेश असल्याची माहिती आहे.

जमिनी, शेती, बंगल्याची बँकेतील कागदपत्रे जप्त

जालन्याच्या या चारही स्टील व्यावसायिकांपैकी तिघांकडे राेख रकमेसह साेन्याचे दागिने नों बिस्किटे, विटा, नाणी, हिरे मिळाले. सोन्याच्या ३२ किलो दागिन्यांची बाजारभावानुसार किंमत १६ कोटी रुपये आहे. या व्यापाऱ्यांची घरे, कार्यालयांतून वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जमिनी, शेती, बंगले यांसह बँकांतील ठेवी, इतर व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे जप्त केली. एकूण सुमारे ३०० काेटींची बेहिशेबी मालमत्ता आढळल्याचा दावा पथकाने केला.


या छापेमारीसंबंधी आयकर विभागाने अधिकृत प्रेसनोट जारी केली आहे.  आयकर विभागाने 3 ऑगस्ट रोजी स्टील टीएमटी बारच्या निर्मितीमध्ये गुंतलेल्या दोन प्रमुख उद्योगांवर छापेमारी केली. या छापेमारीत जालना, औरंगाबाद, नाशिक आणि मुंबईमध्ये पसरलेल्या 30 हून अधिक ठिकाणांचा समावेश होता. या छापेमारीच्या दरम्यान अनेक दोषी पुरावे सापडले आहेत आणि जप्त करण्यात आले आहेत. दोन्ही उद्योगांकडून जप्त केलेल्या पुराव्यांच्या प्राथमिक विश्लेषणातून असे दिसून आले आहे की, ते अनेक संस्थांकडून बोगस खरेदीद्वारे खर्च वाढवून मोठ्या प्रमाणावर कर चुकवेगिरी करण्यात गुंतले आहेत.  या संस्थांचा जीएसटी घोटाळ्यातही सहभाग असल्याचे आढळून आले आहे.  कच्च्या मालाचा जास्तीचा साठा, हिशेबाच्या वहीत नोंद नसलेला 120 कोटी रुपयांहून जास्त असल्याचा पुरावा सापडला आहे. एका उद्योगातून सापडलेल्या पुराव्यांच्या तपासणीत पुढे असे दिसून येते की कोलकाता स्थित शेल कंपन्यांकडून मिळवलेल्या बोगस असुरक्षित कर्जे आणि शेअर प्रीमियमच्या माध्यमातून त्याने आपले बेहिशेबी उत्पन्न जमा केले आहे.


मागील १ ऑगस्टपासून हे छापेसत्र सुरु आहे. तब्बल ८ दिवस ही कारवाई चालली. आयकर विभागाचे अधिकारी वेगवेगळ्या पथकांमार्फत पोहोचले व एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली. आयकर विभागाने नवीन एमआयडीसीमधील तीन रोलिंग मिल आणि त्यांच्याशी निगडित आर्थिक व्यवहारांची तपासणी केली. यामध्ये औरंगाबादमधील एका प्रख्यात लँड डेव्हलपर आणि व्यापार्‍याचाही समावेश आहे. या कारवाईमध्ये तब्बल ३९० कोटींची रोकड हाती लागली. ही रोकड मोजण्यासाठी अधिकार्‍यांना तब्बल १६ तास लागले.

Share This Article
Exit mobile version