जळगाव जामोद/बुलढाणा (राजेश लोखंडे) – जळगाव जामोद तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते स्व. संतोष देशमुख यांच्या मृत्यूप्रकरणी एक संभ्रमात्मक वातावरण निर्माण झालेले आहे. यातच गेली दोन महिने शांत असलेले आमदार संजय कुटे यांनी काल, दि. २ जुलै रोजी दुपारी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्ष्यवेधीमध्ये मुद्दा मांडताना व्यासपीठाला अशी मागणी केली की, माझ्याच मतदासंघातील भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता स्व. पंकज देशमुख यांच्या मृत्यूची सीआयडी, सीबीआय किंवा त्याहीपेक्षा पुढे जाऊन एखाद्या न्यायालयाचे न्यायाधीश किंवा उच्चस्तरीय समिती नेमून पंधरा दिवसाच्यआत याप्रकरणी सखोल चौकशी होऊन खरे ते काय जनतेसमोर आणावे, आणि तयार झालेल्या संभ्रमात्मक वातावरणावर पडदा टाकावा, यामुळे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल!
दि. ३ मेरोजी जळगाव जामोद ते बर्हाणपूर रोडवरील शेतातील झाडाला रुमालाने लटकलेल्या अवस्थेत स्व. पंकज देशमुख यांचे मृत शरीर आढळलेले होते. प्रत्यक्षदर्शींच्या मते आणि व्हायरल झालेल्या फोटोग्राफच्या आधारे स्व. पंकज देशमुख यांच्या शरीरावर काही जखमा आणि खुणा दिसल्याने आणि काही संशयास्पद कारणांनी पंकज देशमुख यांची आत्महत्या आहे की, घातपात आहे, असा संशय पंकज देशमुख यांची पत्नी सौ. देशमुख आणि कुटुंबियांना आला. स्व. पंकज देशमुख यांच्या पत्नी आणि तालुक्यात तयार झालेली सर्व समावेशक सर्वपक्षीय समिती यांनी मिळून एसडीओ आणि जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन योग्य कारवाई व चौकशीसाठी निवेदन दिले होते. तसेच सोशल मीडियावरसुद्धा स्व. पंकज देशमुख कुटुंबियांच्या चाहत्यांनी आणि स्वतः देशमुख यांच्या पत्नी दररोज विविध प्रश्न ऊठवत आपली चौकशीची मागणी लावून धरली होती. हे सगळे होत असताना पोलिसांच्या कार्यक्षमतेवर तसेच कार्यशैलीवरसुद्धा संशय उठविण्यात आला. प्रत्यक्ष कोणत्याही गुन्हेगारावर संशय मात्र कोणीही नावासह घेतला नाही, परंतु मतदारसंघात दबक्या आवाजात जनता उलटसुलट चर्चा करत हा खून असल्याचे व आपापल्या मार्गाने हा खून असल्याचे आणि खुनी कोण असल्याचा आणि त्याला शोधण्याचा आणि सांगण्याचा पडद्याआड प्रयत्न करीत होती, समोर येऊन कोणीही गुन्हेगाराचे नाव घ्यायला तयार नव्हते. याप्रकरणी मलकापूरचे डीवायएसपी कार्यालय सध्या चौकशी करत असल्याचे कळते. या सगळ्या वातावरणामुळे जळगाव जामोद मतदारसंघामध्ये गंभीर आणि संभ्रमात्मक वातावरण निर्माण झाले होते. या सगळ्या परिस्थितीवर आमदार संजय कुटे लक्ष ठेवून होते. शेवटी त्यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये लक्षविधी मांडताना व्यासपीठासमोर चौकशीची मागणी केली. त्यामुळे स्व. पंकज देशमुख मृत्यूप्रकरणी उचित चौकशी होऊन नेमके काय ते लवकरच जनते समोर येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

