– नांदुरा तालुक्यातील दुर्देवी घटना; शिक्षकालाही ग्रामस्थांची बेदम मारहाण – पोलिसांत गुन्हे दाखल; शिक्षकावर आयसीयूत उपचार सुरू!
नांदुरा (तालुका प्रतिनिधी) – वर्गात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर न आल्यामुळे शिक्षकाने विद्यार्थ्याला उठबशा काढायची शिक्षा दिली. ही शिक्षा अपमानीत वाटल्याने दहावीच्या विद्यार्थ्याने घरी जाऊन स्वतःच्या गोठ्यात गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी या शिक्षकाला बेदम मारहाणही केली. याप्रकरणी संबंधित शिक्षकाविरोधात नांदुरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित शिक्षक सद्या पोलिसांच्या निगरानीत असून, ग्रामस्थांच्या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहेत.
नांदुरा तालुक्यातील वसाडी बुद्रूक येथील जय बजरंग विद्यालयात इयत्ता दहावीत शिकणारा विवेक महादेव राऊत (वय १५) याला गोपाल मारूती सूर्यवंशी या शिक्षकाने वर्गात अभ्यासक्रमाचा प्रश्न विचारला असता, त्या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्याला आले नाही. त्यामुळे उठबशा काढण्याची शिक्षा शिक्षकांनी दिली. तसेच, अपमानीत केले. त्यामुळे विवेक राऊत याने घरी जाऊन गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. विनायकने सुसाईड नोट लिहून त्यात शिक्षकाने मानसिक छळ केल्याचे नमूद केले असून, वडिलांविषयी अपशब्द वापरल्याने आत्महत्या करत असल्याचे नमूद केलेले आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांच्या संतापाचा पारा चढल्याने ग्रामस्थांनी सूर्यवंशी या शिक्षकांना बेदम मारहाण केली. मारहानीत जखमी झाल्याने त्यांना रूग्णालयात भरती करावे लागले. याप्रकरणी नांदुरा पोलिसांत शिक्षक सूर्यवंशी यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, सदर शिक्षक गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर आयसीयूमध्ये वैद्यकीय उपचार सुरू आहेत. रूग्णालयातून सुट्टी झाल्यानंतर त्यांना अटक केली जाणार असून, सद्या ते पोलिसांच्या निगरानीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.