चिखली/देऊळगावराजा (रंजना मोरे/राजेंद्र डोईफोडे) – खडकपूर्णा प्रकल्पाच्या नदीपात्रातून अवैध रेतीची चोरी करून टिप्परच्या साह्याने वाहतूक सुरू असल्याची गुपित माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना मिळाली असता, त्यांनी संबंधित अधिकार्यांना फोन लावला. त्यामुळे लगेच मंडळ अधिकारी व तलाठी यांनी घटनास्थळी जाऊन अवैध रेतीची वाहतूक करणारे दोन टिप्पर पकडले. मात्र त्यांना तडजोड करता आली नाही, अवैध रेतीसह टिप्पर जप्त करून वरून दोन्ही वाहन चालकांविरुद्ध कारवाई करावी लागली. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी यांनी निगरानी पथके तैनात करूनही अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याने या निगरानी पथकाचे स्वतः जिल्हाधिकारी यांनीच पितळ उघडे पाडल्याने आता या बेजबाबदार पथकांवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
अंढेरा पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्या गारवा हॉटेल, चिंचखेड, आणि अंढेरा फाटा या ठिकाणावरून दररोज मोठ्या प्रमाणावर वाळूमाफिया हे रेतीची अवैधरित्या टिप्परच्या साह्याने वाहतूक करतात. या अवैध रेतीच्या वाहतूकवर देखरेख ठेवण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यातच या कर्मचार्यांसोबत आरटीओ विभागाचे पोलिस कर्मचारी देण्यात आले आहेत. मात्र आरटीओ विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे अगोदरच वाळूमाफियांसोबत हातमिळवणी करून साटेलोटे करीत असल्याने वाळूमाफिया हे रात्रंदिवस अवैध रेतीची वाहतूक करतात. मात्र वाळूमाफिया हे रेतीची वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना मिळाली असता, त्यांनी लगेच फोन लावून महसूल कर्मचार्यांना वाहने पकडण्याचे आदेश दिले. त्यामुळे महसूल विभागाच्या अधिकार्यांनी धावपळ करून खडकपूर्णा प्रकल्पाचा नदी पात्रातून अवैध रेतीचा भरना करून भरधाव जाणारा टिप्पर वाहन (क्र.एमएच २८ बीबी ८६७९) हा पांढरे रंगाचे टिप्पर पकडले असता, टिप्परची किंमत १० लाख रूपये त्यामध्ये तीन ब्रास रेती किंमत अंदाजे किंमत ६० हजार रुपये असा अवैधरित्या रेतीमाल विनापरवाना वाहतूक करताना मिळून आला. तसेच अंढेरा फाटा येथे एक पिवळ्या रंगाचे एमएच २८, बी बी ७८७३ क्रमांकाचे टिप्पर पकडण्यात आले. त्यामध्ये दीड ब्रास रेती किंमत ३२ हजार रुपये आणि टिप्परची किंमत २० लाख रूपये असे दोन टिप्पर पकडण्यात आले. मात्र जिल्हाधिकारी यांचे आदेश असल्याने वाळूमाफिया सोबत हातमिळवणी करण्याची संधी संबंधित महसूल कर्मचार्यांना साधता आली नाही. या कारवाईत एकूण दोन्ही मिळून ३१ लाखाचा माल हस्तगत करून जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली मंडळ अधिकारी विजय रामचंद्र हिरवे (वय ५६) आणि तलाठी पंढरीनाथ तुकाराम जायभाय (वय ५३) यांच्या तक्रारीवरून ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली डायरी अंमलदार यांनी आरोपी पवन प्रभाकर तायडे वय ४० वर्ष राहणार चिखली , प्रवीण शिवाजी डोईफोडे वय २७ वर्ष राहणार जागदरी ता. सिंदखेडराजा यांच्याविरूद्ध अप क्र.१९०/२५ कलम ३०३ बीएनएस सहकलम २१(१),२१(२), गौण खनिज अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास बीट जामदार सोनकांबळे आणि वाघ हे करीत आहेत.
मौजे वाकी फाट्याजवळ एक अवैध रेती वाहतूक करणारे एक टिप्पर जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी पकडविले, तसेच मौजे चिंचखेड येथे अवैध रेती वाहतूक करणारे एक टिप्पर पकडण्यात आले. सदर दोन्ही टिप्पर त्यानंतर पोलीस स्टेशन अंढेरा येथे लावण्यात आले. सदर कार्यवाही जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, उपविभागीय अधिकारी प्रा. खडसे तथा तहसीलदार श्रीमती डोंगरजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी विजय हिरवे, ग्राम महसूल अधिकारी श्री जायभाये, श्री उदार, श्री खरात, श्री तागवाले, जाधव, महसूल सेवक श्री काकडे, श्री शेरे व वाहन चालक श्री भोपळे यांच्या पथकाने केली.